मराठमोळ्या शास्त्रज्ञाचा अमेरिकेत डंका, बायडेन यांच्या हस्ते सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित

अमेरिकेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांना नॅशनल मेडल ऑफ सायन्स आणि नॅशनल मेडल फॉर टेक्नोलॉजी अँड इनोव्हेशनने सन्मानित केलं जातं.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये दोन भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञांचा सत्कार केला. नॅशनल मेडल फॉर टेक्नोलॉजी अँड इनोव्हेशन या पुरस्काराने या दोन्ही शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात आला आहे. अशोक गाडगीळ आणि सुब्रा सुरेश अशी या दोन्ही शास्त्रज्ञांची नावं आहेत. लोकांचे जीव वाचवणाऱ्या वैद्यकीय उपचार पद्धतींना अधिक सक्षम करू शकतील असे शोध लावणे, विविध आजारांशी लढण्यास मदत करणे आणि अन्न सुरक्षा सुधारण्यासह वेगवेगळ्या संशोधन कार्यात महत्त्वाचं योगदान दिल्याबद्दल या दोन भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात आला आहे.

हे वाचले का?  Social Media Ban for Kids : “लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार, ‘हा’ देश कायदा बनवण्याच्या तयारीत!

अशोक गाडगीळ हे अमेरिकेच्या लॉरेन्स बर्कली नॅशनल लॅबोरेटरीत वैज्ञानिक म्हणून काम करत आहेत. तसेच ते कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. गाडगीळ यांनी त्यांचं उच्च शिक्षण आयआयटी कानपूर आणि बर्कली विद्यापीठातून पूर्ण केलं आहे. तर सुब्रा सुरेश हे मुळचे मुंबईकर आहेत. ते सध्या कार्नेजी मेलन विद्यापीठाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. सुरेश हे अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेचे संचालकही आहेत. यापूर्वी ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीच्या अभियांत्रिकी विभागाचे कुलगुरू होते.

हे वाचले का?  Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, विशेष न्यायालयाचे आदेश; कारण काय?

गाडगीळ आणि सुरेश यांचा गौरव करताना व्हाईट हाऊसने म्हटलं आहे की, आज अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन अनेक शास्त्रज्ञांना नॅशनल मेडल ऑफ सायन्स आणि नॅशनल मेडल फॉर टेक्नोलॉजी अँड इनोव्हेशनने सन्मानित करत आहेत. आपल्या देशाच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी ज्यांनी नवं तंत्रज्ञान शोधलं आहे, नवे शोध लावले त्यांचा विज्ञान क्षेत्रातल्या देशातील सर्वोच्च पुरस्काराने गौरव करत आहोत. १९५९ पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती.

व्हाईट हाऊसने यासंबंधी एक निवेदन जारी केलं आहे. या निवदेनात म्हटलं आहे की, जीवशास्त्र, संगणक विज्ञान, शैक्षणिक विज्ञान, अभियांत्रिकी, भूगर्भशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सामाजिक, व्यावहारिक आणि आर्थिक विज्ञानाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. या क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणारे शास्त्रज्ञ हे अमेरिकेच्या अध्यक्षांच्या हस्ते विशेष सन्मानास पात्र आहेत.