महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू नेमका कशासाठी? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

करोना काय फक्त रात्री फिरतो का? अशी विरोधकांची टीका

ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून राज्यात मंगळवारपासून ५ जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. करोना काय फक्त रात्री फिरतो का? असा उपरोधिक सवालही विरोधक विचारत आहे. विरोधकांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.

राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट झाली होती. नववर्षांच्या सुरुवातीला शाळा-महाविद्यालयांप्रमाणेच सर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू करण्याची तयारी करण्यात येत होती. मात्र, ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने राज्य सरकार अधिक सावध झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे रविवारी दुपारी समाजमाध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदी वा रात्रीची संचारबंदीची शक्यता फेटाळली होती. परंतु ब्रिटनमधील करोनाचा नवा प्रकार लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला.

हे वाचले का?  IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं –
“दोन दिवसांपासून संचारबंदी सुरु असून अनेकजण करोना रात्री मोकाट फिरतो आणि दिवसा घऱात बसतो का? अशी विचारणा करत आहेत. तसं नाहीये….जनतेला थोडीशी जाणीव करुन द्यायची गरज असते. अजूनही आपल्याला बंधनांची आवश्यकता आहे. दिवसा आपण लॉकडाउन करु शकत नाही. तशी वेळही येऊ नये. निदान रात्रीची संचारबंदी आहे म्हटल्यावर त्यांना धोक्याची जाणीव होते. अनावश्यक गर्दी टाळणं हे जास्त महत्वाचं आहे”.

हे वाचले का?  Sanjay Shirsat: भरत गोगावलेंचं मंत्रीपद संजय शिरसाटांमुळे हुकलं? ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण; शिंदे गटातली धुसफूस चव्हाट्यावर!

नाताळ उत्साहावर विरजण
राज्यात मंगळवारी रात्रीपासून ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६पर्यंत संचारबंदी लागू राहील. संचारबंदीच्या निर्णयामुळे सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणाऱ्या जल्लोषावर पूर्णपणे निर्बंध आले आहेत. नाताळच्या उत्साहावरही विरजण पडणार असून, विशेषत: हॉटेल व्यवयासाला त्याचा मोठा फटका बसेल, असे मानले जाते.

ब्रिटन-भारत विमानसेवा ३१ डिसेंबपर्यंत बंद
ब्रिटनमध्ये वेगाने पसरणारा करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानंतर भारत आणि ब्रिटनदरम्यानची विमान वाहतूक बुधवारपासून ३१ डिसेंबपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय हवाई वाहतूक विभागाने सोमवारी घेतला. यामुळे या कालावधीतील सर्व विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी, ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळांवर तपासणी करण्यात येईल. त्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. कॅनडा, बेल्जियम, इटली आणि इस्रायल आदी देशांनी ब्रिटनशी हवाई वाहतूकसेवा आधीच खंडित केली आहे.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले