महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अव्वल: मुख्यमंत्री

स्वातंत्र्यदिनी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झाले.

मुंबई: विदेशी थेट गुंतवणुकीप्रमाणेच कृषी, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात आपला महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून, आगामी काळातही तो अव्वल स्थानावरच राहील असा ठाम विश्वास व्यक्त करीत राज्याचे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्व जण शपथबद्ध होऊ या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केले.

स्वातंत्र्यदिनी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे मुंबई येथील प्रमुख अधिकारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

समाजातील शेवटच्या घटकाला स्वातंत्र्य आणि विकास अनुभवता यावा यासाठी गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालता आली पाहिजे. तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत, असा शासनाचा मानस असून स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात झाले पाहिजे, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

केंद्राप्रमाणेच राज्यातही विकासाची, प्रगतीची गंगा वाहावी यासाठी गेले वर्षभर काम करता आले याचा विशेष आनंद होत असून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वयाचा नवा अध्याय लिहिला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शासन आपल्या दारीसारख्या क्रांतिकारी योजनेत सव्वा कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना करोडो रुपयांचे लाभ दिले. केवळ एक रुपयात पीक विमा योजना जाहीर करून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच दीड कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदत केली. आजवर साडेबारा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत सरकारने बळीराजाला दिली आहे, असेही शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

हे वाचले का?  कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा; कोकण व गोवामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार

दिल्लीत महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रूपिंदर सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी समूह राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथसंचलनही झाले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार, निवासी अभियंता जे.डी. गंगावार यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुंबई उच्च न्यायालयात ध्वजारोहण

मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयातील आजी माजी न्यायाधीश आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तर विधान भवनामध्ये विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, सहसचिव शिवदर्शन साठय़े यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.