“माझा वेळ अदाणी, अंबानीपेक्षाही मौल्यवान”, बाबा रामदेव यांनी सांगितले पंतजलीच्या ४० हजार कोटींच्या टर्नओव्हरचे रहस्य

बाबा रामदेव यांनी गोव्यामध्ये बोलत असताना त्यांचा वेळ अदाणी, अंबानी या अब्जाधीशांपेक्षाही मौल्यवान असल्याचे म्हटले.

योगगुरु बाबा रामदेव यांचे ताजे वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. रविवारी गोव्यात बोलत असताना ते म्हणाले की, कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक ९९ टक्के वेळ स्वतःचा स्वार्थ साधण्यात घालवतात. तर माझ्यासारखे साधू स्वतःचा वेळ समाजाच्या भल्यासाठी वापरतात. तसेच मी तीन दिवस याठिकाणी राहिलो, हा वेळ अदाणी, अंबानी सारख्या अब्जाधीशांपेक्षाही माझ्यासाठी मुल्यवान वेळ होता. गोव्यामध्ये रामदेव बाबा यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, तसेच केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक देखील उपस्थित होते. यावेळी रामदेव बाबा यांनी स्वतःच्या वेळेबाबत केलेले वक्तव्य इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.

हे वाचले का?  नाशिक फाटा-खेड महामार्गासाठी ८ हजार कोटी; केंद्राकडून महत्त्वाकांक्षी ८ प्रकल्पांना मंजुरी  

आपल्या भाषणात रामदेव बाबा म्हणाले की, मी हरिद्वारहून तीन दिवसांसाठी याठिकाणी आलो आहे. माझ्या वेळेचे मूल्य हे अदाणी, अंबानी, टाटा, बिर्ला यांच्यापेक्षाही अधिक आहे. कॉर्पोरेटमधील भांडवलदार ९९ टक्के वेळ स्वतःच्या स्वार्थासाठी खर्च करतात, तर साधू स्वतःचा वेळ समाजाच्या भल्यासाठी वापरतात.

तसेच रामदेव बाबा यांनी आचार्य बालकृष्ण यांचे कौतुक केले. पतंजलि कंपनीला पुनर्जीवित करुन या आर्थिक वर्षात कंपनीचा टर्नओव्हर ४० हजार कोटींवर पोहोचला असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले. तोट्यात चालणाऱ्या कंपनीला आचार्य बाळकृष्ण यांनी व्यावसायिक दृष्टीकोन, पारदर्शी व्यवस्थापन आणि उत्तरदायी नेतृत्व दिल्यामुळे पंतजलिचा टर्नओव्हर हजारो कोटींवर पोहोचला आहे. भारताला ‘परम वैभवशाली’ बनविण्यासाठी पंतजलि सारखे साम्राज्य उभे राहायला हवेत, असेही बाबा रामदेव म्हणाले.

हे वाचले का?  Fraud Supreme Court : बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश अन् खोटा निकाल… सायबर ठगांचा व्यावसायिकाला सात कोटींचा गंडा

करोनानंतर कर्करोगाचे प्रमाण वाढले

योगगुरु बाबा रामदेव यांनी या सभेत असेही सांगितले की, करोना महामारीनंतर देशात कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. तसेच करोनानंतर अनेक लोकांनी आपले डोळे गमावले असल्याचेही बाबा रामदेव म्हणाले. मात्र बाबा रामदेव यांचा हा दावा आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी फेटाळून लावला आहे.