मार्चअखेरपूर्वी वसुली, निधी खर्चाची लगीनघाई; रात्र थोडी सोंगें फार अशी स्थिती

आर्थिक वर्ष संपत असल्याने विविध शासकीय विभागांसह महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून थकबाकी वसुलीबरोबर विविध योजनांसाठी प्राप्त झालेला निधी माघारी जाऊ नये म्हणून खर्च करण्याची एकच लगबग सुरू असल्याचे चित्र आहे.

नाशिक : आर्थिक वर्ष संपत असल्याने विविध शासकीय विभागांसह महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून थकबाकी वसुलीबरोबर विविध योजनांसाठी प्राप्त झालेला निधी माघारी जाऊ नये म्हणून खर्च करण्याची एकच लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पुढील तीन दिवस ही स्थिती कायम राहणार असून वेळ अपुरा पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन ३१ मार्च रोजी शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँकांच्या शाखा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास केवळ दोन दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे विकासकामे, शासकीय योजनांसाठी प्राप्त निधी, कार्यालयीन खर्च व तत्सम बाबींची देयके, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके मंजूर करून घेण्याकरिता शासकीय कार्यालयांमध्ये चांगलीच धावपळ सुरू आहे. चालू आर्थिक वर्षांत काही काळ करोनाच्या निर्बंधांना तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे प्रारंभीचे काही महिने शासकीय योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण कमी असल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून उघड झाले होते. ३१ मार्चपूर्वी उपरोक्त निधीचा विनियोग न झाल्यास तो माघारी जातो. मुळात निधीची चणचण असताना मिळालेला निधी परत जाणे संबंधित विभागासाठी नामुष्कीची बाब ठरते. ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून शासकीय विभाग सक्रिय झाले आहेत. ३१ मार्चआधी निधीचा विनियोग करण्यावर त्यांचे लक्ष आहे. मार्चअखेरची एकंदर स्थिती लक्षात घेऊन लेखा आणि कोषागार शाखेने शासकीय विभागांची गैरसोय टाळण्यासाठी शनिवार या सुट्टीच्या दिवशी कामकाज करण्याचे ठरवले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य लेखा व कोषागार विभागासह १४ तालुक्यांमधील उपलेखा व कोषागार कार्यालये पूर्णवेळ सुरू ठेवण्यात येणार आहेत.
लेखा व कोषागार विभागाने शासकीय, निमशासकीय अशी ३६ हून अधिक विभागांची चालू आर्थिक वर्षांत ७३ हजारांहून अधिक देयके मंजूर केल्याचे सांगितले जाते. त्यांची रक्कम नऊ हजार कोटींहून अधिक आहे. मार्चअखेपर्यंत ही आकडेवारी १० हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था थकबाकी वसुलीत गुंतल्या आहेत. महापालिकेने बडय़ा थकबाकीदारांकडे मोर्चा वळवला असून तिजोरीत शक्य तितकी भर घालण्याचा प्रयत्न आहे. नव्या आर्थिक वर्षांत रेडिरेकनरचे दर वाढण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी दस्तनोंदणीचा अनेकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुद्रांक कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी झाली आहे.
३१ मार्चला शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँका रात्री १२ वाजेपर्यंत सुरू
आर्थिक वर्ष संपुष्टात येण्याच्या दिवशी म्हणजे ३१ मार्च रोजी शासनाचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेचा नेहमीचा कार्यालयीन वेळ पुरेसा नसल्याने या दिवशी एसबीआयची कोषागार शाखा, नाशिकरोड, देवळाली कॅम्प शाखा तसेच देना बँकेची सुरगाणा शाखा व शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या अन्य बँकेच्या शाखा, कार्यालये रात्री १२ वाजेपर्यंत खुल्या ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी काढले आहेत. शासनाकडून विविध शासकीय विभाग व कार्यालयांना वित्तीय वर्षांच्या अखेरच्या दिवशी उशिरापर्यंत प्राप्त झालेले अनुदान खर्ची टाकून जिल्हा कोषागार व तालुका उपकोषागार कार्यालयांकडून वितरित होणारी देयके, धनादेश स्टेट बँकेत वटवून रक्कम काढणे, महसुली उत्पन्नाच्या रकमा शासनाकडे भरणा करणे यासाठी पुरेसा अवधी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी उपरोक्त निर्णय घेतला गेल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हे वाचले का?  नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा