पारंपरिक लाखेऐवजी ‘मेटॅलिक’ रंगांचा वापर
पारंपरिक लाखेऐवजी ‘मेटॅलिक’ रंगांचा वापर
दिगंबर शिंदे, लोकसत्ता
सांगली : तंतुवाद्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिरजेतील तरुण कारागिरांनी बदलत्या काळाची मागणी ओळखून आता या पारंपरिक वाद्यांना बहुरंगी बनविले आहे. तंबोरे, सतारीच्या या नव्या रूपाला देश-परदेशातील कलाकारांचीही पसंती मिळत आहे. लाखेऐवजी आता ‘मेटॅलिक’ रंगाचा वापर करून मिरजेची सतार बहुरंगी बनवत असताना तिच्यातील स्वरामध्ये कोणताही बदल होणार नाही याची दक्षताही घेतली आहे.
मिरज शहर दीडशे वर्षांहून अधिक काळ तंतुवाद्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. येथून परदेशातही तंतुवाद्यांची निर्यात केली जाते. येथे बनवलेल्या तंबोरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रवीणा यांसारख्या वाद्यांना नामांकित कलाकारांकडून मागणी असते. पारंपरिक पद्धतीमध्ये मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीच्या प्रारंभीच्या काळात पानाचा विडा कुटून त्यात थोडे पाणी मिसळून त्याचा लाल रंग तयार करून तो तंतुवाद्यांना देण्यात येत असे. नंतरच्या काळात लाखेच्या रंगाचा वापर करण्यात येऊ लागला. बत्ताशी आणि पत्रीलाख पातळ करून त्यात स्पिरीट मिसळून पिवळा, तपकिरी, जांभळा यांसारखे रंग देण्यात येऊ लागले. हे रंग देण्यात काही विशिष्ट कारागिरांनी हातखंडा मिळविला होता. गेली अनेक वर्षे स्पिरीटमिश्रित रंगांतील वापर तंतुवाद्यांसाठी होत होता.
आता मात्र नव्या जगाची मागणी, त्यासाठीचा आकर्षक चेहऱ्याचा विचार करता या तंतुवाद्यांच्या रंगसंगतीतही बदल केले जाऊ लागले आहेत. त्यासाठी ‘मेटॅलिक’ रंगांचा वापर होऊ लागला आहे. चारचाकी गाडय़ांना देण्यात येणारे आकर्षक रंग तंतुवाद्यांना वापरण्यात येत आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना हव्या त्या रंगातील तंबोरे आणि सतार तयार करण्यात येत आहेत. हे रंग टिकावू आहेत, त्यामुळे वाद्यांचे आयुष्य तर वाढते. या रंगबदलांमुळे वाद्याच्या स्वरावर कुठलाही परिणाम होत नसल्याचे कारागिरांनी सांगितले. तेच पारंपरिक वाद्य नव्या रूपात मिळू लागल्याने आता त्यांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे.
रंग नवा, दर्जा पूर्वीचाच : पूर्वी गिटार वाद्याला विविध रंगांचे लेपन केले जात असे. आता याच रंगांमध्ये तंबोरे आणि सतार बनवून देण्याची मागणी वाढत आहे. विशेषत: अशा रंगीबेरंगी तंतुवाद्यांना परदेशातून खूप मागणी आहे. मात्र, रंगीत तंतुवाद्य बनवताना ती पूर्वीप्रमाणे दर्जेदार राहतील, याची खबरदारी घेण्यात येत असल्याचे युवा तंतुवाद्य निर्माते नईम सतारमेकर यांनी सांगितले.
रंगप्रयोग
’बदलत्या काळानुसार या पिढीतील युवा कारागीर आता तंतुवाद्य निर्मितीत नवे प्रयोग करत आहेत.
’पारंपरिक वाद्यनिर्मितीला नव्या प्रयोगांची जोड देत ती अधिक लोकप्रिय कशी होतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
’याच प्रयोगाचा एक भाग म्हणून तंतुवाद्यांना पारंपरिक रंग न देता रसिकांना मोहात पाडणारे रंग दिले जात आहेत.