“मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराला तडीपार करण्याचं काम आम्ही करू” आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका!

भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

भारतीय जनता पार्टीची आज कार्यकारिणी जाहीर झाली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांना मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच शेलार यांनी पत्रकार परिषद घेत आपला इरादा स्पष्ट केला आहे. आगामी निवडणुकीत मुंबई महानगर पालिकेत भाजपाचा महापौर असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले आहेत.

हे वाचले का?  भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी? श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा निर्धार, “पक्षाला ताकद दाखवणार”

यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, “आता आमचं ठरलंय, मुंबई महानगरपालिकेत बदल अटळ आहे. मुंबई महानगर पालिकेत आमचाच महापौर बसणार आहे. आगामी काळात मार्गक्रमणा करण्यासाठी त्यापद्धतीची कार्यपद्धती आणि कार्यरचना यापुढे भाजपाकडून केली जाणार आहे. केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या अपेक्षेनुसार मुंबईत भाजपाचं काम अजून गतीनं वाढवणार आहे. तसेच मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकीत चांगलं यश मिळवू, याची खात्रीसुद्धा मी आपल्या माध्यमातून देतोय.

खरं तर, मी आणि माझे सहकारी गेली दोन दशकं हा संघर्ष करतोय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबई आमचीच जहागिरी आहे, असं मानून मुंबई महानगर पालिकेत आणि मुंबईत भ्रष्टाचाराची बजबजपुरी केली, त्याला तडीपार करण्याचं काम मी आणि आमचे सहकारी मिळून करू. मुंबईकरांच्या मनातील, स्वप्नातील, डोक्यातील विकासाचे मुंबईचं चित्र रंगवून, मुंबईकरांना सुपूर्त करायचं आहे. निकृष्ट दर्जाचे कोस्टल रोडवरचे काम, मेट्रो कारशेडबाबतचा अहंकार, यातून मुंबईकरांच्या डोक्यावर भुर्दंड टाकला जातोय, असा आरोप शेलार यांनी यावेळी केला.

हे वाचले का?  “बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!