“मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी”

“पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा….”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनंतर पक्ष सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची भेट घेऊन प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. शरद पवारांनीही तक्रार गंभीर असून पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे. यादरम्यान शरद पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याच्या वृत्तावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

हे वाचले का?  माजी अग्निवीरांना दिलेल्या १० टक्के राखीव जागांवरून ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, “आरक्षणाच्या लॉलीपॉपने…”

अतुल भातळखकर यांनी ट्विट करत शरद पवारांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. “पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे,” अस अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

यादरम्यान मुंडे यांच्यावर आरोपाला नवी कलाटणी मिळाली असून भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. संबंधित महिलेने आपल्यालाही अडकवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केली. हेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मनसेचे पदाधिकारी मनीष धुरी यांनीही आपल्याला या महिलेने दूरध्वनी केले असा आरोप केला आहे. या दोन राजकीय नेत्यांशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने महिलेबाबत अशीच तक्रार नोंदवली आहे.