मुलींच्या वसतिगृहाचा कारभार चर्चेत

‘तो’ प्रकार घडला नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष 

येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींना विवस्त्र करून चित्रीकरण करण्यात आल्याच्या गंभीर तक्रारीच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने स्थापलेल्या महिला अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने वसतिगृहातील मुली, महिला, कर्मचारी आणि आसपास वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे जबाब नोंदविले. समितीने वसतिगृहात तसा काही प्रकार घडल्याचे आढळून आले नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे. तरीदेखील तक्रार गंभीर असल्याने पुढे चौकशी सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या घटनाक्रमाने निराधार, विधवा, परितक्त्या महिलांना आधार देण्यासाठी असलेल्या शासकीय वसतिगृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

राज्यातील बहुतांश शासकीय वसतिगृहांची अवस्था कशी आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. वसतिगृह मुली, महिलांसाठी असेल तर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक खबरदारी बाळगणे आवश्यक ठरते. परंतु शासकीय, प्रशासकीय यंत्रणांची अनास्था अशा वसतिगृहांमध्ये वास्तव्य करणाऱ्यांना नेहमीच अनुभवास येते. मुलींच्या आशादीप शासकीय वसतिगृहातील तक्रार अतिशय गंभीर आहे. या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली. ही समिती वसतिगृहात चौकशीसाठी गेली, तेव्हा त्यांच्यासमोर गोंधळ झाला. समितीसमोर तक्रारदार मुलगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत होती. पण, तिला रोखण्यात आले. आम्हाला बोलू दिले जात नाही, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे ती ओरडून सांगत होती. समितीने वसतिगृहाच्या अधीक्षक, परिवीक्षाधीन महिला अधिकारी तसेच महिला, मुलींचे जबाब नोंदवून घेतले. या प्रकरणाची पोलिसांनी समांतरपणे चौकशी केली.

हे वाचले का?  दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज

वसतिगृहात एकूण १८ मुली, महिला होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार करणाऱ्या मुलीने मारहाण केल्याने पाच जणींना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये निरीक्षणगृहात हलविण्यात आले. एका मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. वसतिगृहात सध्या १२ मुली आहेत. भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, सामाजिक कार्यकर्त्यां सरिता नेरकर यांनी वसतिगृहास भेट देऊन मुलींशी संवाद साधला. तक्रारदार मुलीची तक्रार प्रशासनाने नोंदवून घ्यायला पाहिजे. तक्रार करणे हा मुलीचा हक्क आहे. तिला तक्रार करण्यापासून रोखले जात असेल तर हे योग्य नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मंगळवारी संस्थेत येऊन गोंधळ घालणाऱ्या पुरुष-महिलांविरुद्ध कर्मचाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली. चौकशीच्या नावाखाली पोलिसांकडून गैरप्रकार केला जात असल्याचा आरोप करून सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. स्थानिकांकडून वसतिगृहाबाबत दिल्या जाणाऱ्या माहितीत तफावत आहे. चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात तसा प्रकार घडल्याचे आढळून आले नसल्याचे म्हटले आहे.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ६.५२ टक्क्यांनी वाढ – ६९.१२ टक्के मतदान, मतटक्का वाढीत महिलांचा लक्षणीय हातभार

चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात आशादीप शासकीय वसतिगृहात तसा काही प्रकार घडल्याचे आढळून आलेले नाही. तक्रार गंभीर असल्याने या प्रकरणाची चौकशी पुढेही सुरू राहील. तक्रारदार मुलींना बोलू दिले जात नसल्याचा प्रकार घडलेला नाही. सर्वाचे जबाब घेण्यात आले. सर्व मुली त्यांच्या कुटुंबीयांच्यादेखील संपर्कात आहेत. सर्व मुलींनी स्वखुशीने जबाब दिलेले आहेत. – अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; अजित पवार गट नाराज? म्हणाले, “आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं”