“मोदी-शाहांनी अहंकाराच्या सर्व मर्यादा तोडल्या, तुम्ही काय करणार?” संजय राऊतांचा आरएसएसला थेट सवाल

“फक्त बोलून आणि लिहून काही होणार नाही. आम्हीही लिहितो. पण आम्ही कारवाईही करतो”, असं संजय राऊत म्हणाले.

“नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी मर्यादा पाळल्या नाहीत”, असं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपालाच चपराक लगावली. तसंच, आरएसएसच्या मुखपत्रात अजित पवारांना बरोबर घेतल्याने भाजपाचा पराभव झाला असल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे आरएसएस आणि भाजपा यांच्यात आता सख्य राहिलं नसल्याचं वारंवार समोर येतंय. यावरून ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी टीका केली आहे.

“आरएसएस ही भाजपाची मातृसंस्था होती. आरएसएसने भाजपाला वाढवलं, नैतिक ताकद दिली. परंतु, १० वर्षात भाजपाच्या शीर्ष नेत्यांनी आएसएसला संपवण्याचा प्रयत्न केला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष भाजपाने तोडले. अशोक चव्हाण, अजित पवार, एकनाथ शिंदेंसह सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन सत्ता ताब्यात घेऊ पाहत होते. ज्या अजित पवार आणि अशोक चव्हाणांना मोदी जेलमध्ये टाकायची भाषा करत होते, त्यांनाच त्यांनी पक्षात घेतलं. आरएसएसचं म्हणणं आहे की याला त्याला घेऊ नये, पण त्यांनी घेतलं, तुम्ही काय केलं? लोकसेवकाने अहंकारी असू नये, असं मोहन भागवत म्हणाले. पण अहंकाराच्या सर्व मर्यादा मोदी आणि शाहांनी तोडल्या आहेत. मग आता काय करणार? तुमच्यात बंडखोरी करण्याची हिंमत आहे का? भाजपामध्ये तुमचे लोक बसले आहेत, खूप लोक आहेत. ते मोदी आणि शाहांविरोधात बंडखोरी करणार का? फक्त बोलून आणि लिहून काही होणार नाही. आम्हीही लिहितो. पण आम्ही कारवाईही करतो”, असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

हे वाचले का?  पाऊले चालती तुळजापूरची वाट…; कोजागरीनिमित्त शेकडो भाविकांनी रस्ते फुलले

मोहन भागवतांनी मणिपूरमध्ये जावं

“आरएसएसमध्ये असलेले गडकरी गप्प बसले आहेत. राजनाथ सिंहही आरएसएशी संबंधित आहेत. देशात दोन हुकुमशाहा भ्रष्टाचाराला वाव देत आहेत”, असंही संजय राऊत म्हणाले. मोहन भागवतांनी मणिपूर प्रकरणावरून नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. त्यावर संजय राऊत म्हणाले, “मोहन भागवतही मणिूपमध्ये गेले नाहीत, काश्मीरमध्येही गेले नाहीत. मोदी, शाह आणि इस्ट इंडिया कंपनीचे लोक जात नाही, तर तुम्ही जा. आम्ही तुमच्याबरोबर येऊ. तुम्ही नेतृत्त्व करा देशहितासाठी आम्ही येऊ बरोबर. बाते करून काही होणार नाही”, असंही ते म्हणाले.