म्हाडाच्या सोडतीला यंदा कमी प्रतिसाद, ऑनलाइन प्रणालीचा परिणाम

यंदा प्रथमच इंटिग्रेटेड हाउसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम (आयएचएलएमएस) २.० या नव्या संगणक प्रणालीचा अवलंब करण्यात आला. त्याचा फटका म्हाडा पुणे मंडळाला बसला आहे.

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने पुणे, पिंपरी-चिंचवडमधील ५९१५ घरांसाठी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच सोडत काढली होती. यंदा प्रथमच इंटिग्रेटेड हाउसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम (आयएचएलएमएस) २.० या नव्या संगणक प्रणालीचा अवलंब करण्यात आला. त्याचा फटका म्हाडा पुणे मंडळाला बसला आहे. या सोडतीसाठी फक्त ६४ हजार ७८१ जणांचे अर्ज आले. म्हाडाच्या यापूर्वीच्या सोडतीसाठी एक लाखापेक्षा जास्त अर्ज आले होते.

म्हाडा पुणे मंडळाने जानेवारीच्या सुरुवातीला ५९१५ घरांसाठी सोडत जाहीर केली. त्यामध्ये म्हाडाच्या विविध योजनेतील २५९४ घरे, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २९९० घरे आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३९६ घरांचा समावेश आहे. यंदा आयएचएलएमएस २.० या संगणकप्रणालीचा वापर करण्यात आला. त्यानुसार अर्जदारांना अर्ज भरताना पॅनकार्ड, आधारकार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रे संगणकीकृत करणे बंधनकारक करण्यात आले होते. ही पूर्तता करताना नागरिकांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे अनेक नागरिकांच्या अर्जांची पूर्तता होऊ शकली नाही. या सोडतीला मिळालेला अल्प प्रतिसाद पाहून म्हाडाने घरांसाठी अर्ज करण्याला एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. ही मुदत रविवारी (२६ फेब्रुवारी) संपली. यंदा झालेल्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे गेल्या काही सोडतींच्या तुलनेत अर्जांची संख्या घटली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे वाचले का?  सांगली जिल्ह्यातील ७९ गावांत ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम, यावर्षी नव्या २२ गावांची भर

यंदा नव्या प्रणालीत एक लाख १६ हजार ५४७ नागरिकांनी यूजर आयडी तयार केला. त्यापैकी ९१ हजार ७० जणांची नोंद डिजिलॉकरमध्ये करण्यात आली. ७५ हजार ७५० जणांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले, तर ७१ हजार १६७ जणांचे पॅनकार्ड प्रमाणित करण्यात आले. ४९ हजार ७१२ जणांचा रहिवास दाखला प्रमाणित करण्यात आला, तर एकूण ६४ हजार ७८१ जणांनी सोडतीसाठी अर्ज केले आणि त्यापैकी केवळ ४५ हजार ४६१ जणांनी सोडतीसाठी पैसे भरले.

हे वाचले का?  CM Eknath Shinde : “उद्धव ठाकरेंनी आधी उरली सुरलेली शिवसेना…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

यंदा तुलनेने कमी प्रतिसाद

म्हाडाच्या घरांच्या सोडतीत मानवी हस्तक्षेप होतो किंवा वशिलेबाजी केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज प्रक्रिया यंदापासून मानवी हस्तक्षेप टाळून ऑनलाइन राबविण्यात आली. अर्ज भरण्याच्या सुरुवातीलाच संपूर्ण कागदपत्रे भरण्याची अट ठेवली. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुरुवातीलाच जुना रहिवासाचा दाखला संगणकप्रणालीत स्वीकारला जात नव्हता. त्यामुळे अनेकांना ते मिळविण्यासाठी धावपळ करावी लागली. त्यानंतर प्रणालीत आवश्यक बदल करून नवा दाखला काढण्यासाठी दुवा देण्यात आला. तसेच कागदपत्रांची पडताळणी वेळखाऊ ठरली. त्यामुळे यंदा म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीला यापूर्वीच्या सोडतींच्या प्रमाणात कमी प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live: अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू