“या राज्यात आता काहीही होऊ शकेल”, ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल; नॅशन हेराल्ड प्रकरणावरून डागली तोफ!

“मुख्यमंत्री मिंधे यांनी हे सर्व प्रकरण म्हणे त्यांचे ‘नवे गुरू’ अमित शहांच्या कानावर घातले व मिटवामिटवी केली!”

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडण्यात बाळासाहेब ठाकरेंचा सहभाग नव्हता आणि बाबरी पाडणारे कदापि शिवसैनिक नव्हते, अशा आशयाचं विधान केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला आणि भाजपाला लक्ष्य करण्यात आलं. आता पुन्हा एकदा नॅशनल हेराल्डच्या संपादिका सुजाता आनंद यांच्या विधानावरून वाद होत आहे. यावरून ठाकरे गटानं पुन्हा एकदा भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

“भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने सध्या एकच महापुरुष व श्रद्धास्थान आहेत ते म्हणजे पंतप्रधान मोदी. मोदींवरील टीका ही देशावरील टीका मानून तत्काळ कारवाई केली जाते, पण इतर श्रद्धास्थानांबाबत मात्र भाजपची अळीमिळी गुपचिळी असते.‘नॅशनल हेराल्ड’च्या संपादिका सुजाता आनंद यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला व त्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपने केलेली कारवाईची मागणी योग्यच आहे. पण काय हो भाजप, तुमचे शिवाजी महाराज नक्की कोणते? हा प्रश्नदेखील आहेच”, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून खोचक प्रश्न विचारण्यात आला आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव

भगतसिंह कोश्यारींवरून भाजपावर टीकास्र

“महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर समारंभात छत्रपती शिवरायांचा अपमान करून महाराष्ट्राच्या तसेच हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या. तेव्हा राज्यपालांना तसे म्हणायचे नव्हते. त्यांना असे सांगायचे होते आणि त्यांना तसे बोलायचे होते. त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला अशी फडतूस वकिली भाजपनेच त्यावेळी केली होती. यातच त्यांच्या ढोंगाचे पितळ उघडे पडले. तुमच्या राज्यपालांनी केलेला शिवरायांचा अपमान पचवायचा व इतरांनी केलेल्या अपमानावर शेपटी हलवून जाब विचारायचा याचा काय अर्थ घ्यावा?” असा सवाल ठाकरे गटानं भाजपाला केला आहे.

हे वाचले का?  “पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

“कारवाईचे शेपूट आत का घातले?”

आधी छत्रपती शिवरायांचा अपमान आणि आता हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान. मधल्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतिबा फुले यांचे अपमान पचवून ढेकर देण्यात आलेच होते. हे सगळे करून आता ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी कारवाई करा, अशी बोंब भाजपची मंडळी ठोकत आहेत. ‘नॅशनल हेराल्ड’ व त्यांच्या संपादिकेवर कारवाई करावी, पण भगतसिंह कोश्यारी व चंद्रकांत पाटील यांच्यावरील कारवाईचे काय? त्यांच्यावरील कारवाईचे शेपूट आत का घातले आहे? या राज्यात आता काहीही घडू शकेल असे दिसते!” असा टोलाही अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नवे गुरू?

मिंधे टोळीचे लोक ऊठसूट ‘शिवसेनाप्रमुखांच्या अपमानावर वगैरे शिरा ताणून बोलत असतात. ‘मिंधे’ सरकारमधील एक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनाप्रमुखांचा अपमान करून जो ‘घोटाळा’ केला त्या अपमानावर एकही लाचार मिंधे तोंड उघडायला तयार नाही. पाटील हिंदुहृदयसम्राटांवर बरेच काही बकून गेले. शिवसेनाप्रमुखांचा या अपमानाबद्दल जाब विचारायचे सोडून सर्व मिंधे भाजपचे टाळकरी बनून अपमानकर्त्याचा ‘उदो उदो’ करीत आहेत. मुख्यमंत्री मिंधे यांनी हे सर्व प्रकरण म्हणे त्यांचे ‘नवे गुरू’ अमित शहांच्या कानावर घातले व मिटवामिटवी केली”, असा टोलाही ठाकरे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.