‘या’ सहा तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर कमी; कारणे शोधण्यासाठी कृती समिती गठीत

या सहा तालुक्यांमध्ये मुलींच्या जन्माचा दर का खालावला, याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

नाशिक: जिल्हाधिकारी कार्यालयात गर्भलिंग निदान विषयक झालेल्या बैठकीत सहा तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर खालावल्याची आकडेवारी पुढे आल्याने यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पातळीवर विशेष कृती समिती गठीत करण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळ्या यंत्रणांना सहभागी करून घेण्यात आले आहे.

स्त्री जातीचे अर्भक रस्त्यावर आढळून येणे, कुठे एक दिवसाची मुलगी बस स्थानक परिसरात बेवारस स्थितीत आढळणे, अशा काही घटना मागील काही दिवसात घडल्याने आजही वंशाला दिवाच हवा, ही मानसिकता कायम असल्याचे उघड होत आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मुलींच्या जन्माचा दर कमालीचा घटला आहे. याची दखल गर्भलिंग निदान समितीने घेतली असून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. दर एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण खालावलेल्या तालुक्यांमध्ये येवला ८९६, सुरगाणा ९०४, निफाड ९०५, दिंडोरी ९०६, बागलाण ९१२ आणि सिन्नर ९१६ असे आहे.

हे वाचले का?  इगतपुरीत सरासरी पावसात लक्षणीय घट, नाशिकमध्ये आतापर्यंत ७४८ मिलिमीटरची नोंद

विशेष म्हणजे या सहा तालुक्यांमध्ये आदिवासीबहुल सुरगाणा, दिंडोरीचा समावेश आहे. या आकडेवारीची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या सहा तालुक्यांमध्ये मुलींच्या जन्माचा दर का खालावला, याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत दोन तहसीलदार, दोन वैद्यकीय अधिकारी, दोन वैद्यकीय अधीक्षक, दोन महापालिका आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती या प्रश्नावर काम करणार असून या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील. गरज पडल्यास पोलिसांची मदत घेण्यात येईल. ही कारवाई मार्चपर्यंत सुरू राहणार असून पुढे ही समिती काम करेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हे वाचले का?  गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव

असा घेणार शोध

जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर खालावला आहे. या प्रश्नाची उकल होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने समिती गठीत केली आहे. ही समिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून गर्भपात करणाऱ्या औषधांचा वापर कसा झाला, मुलींच्या जन्माची नोंद होते की नाही, जिल्ह्यात की जिल्हाबाहेर गर्भलिंग निदान होत आहे, अशी सर्व माहिती घेण्यासह आशा-अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गरोदर मातांची माहिती संकलित केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे पुढीलप्रमाणे – येवला ८९६, सुरगाणा ९०४, निफाड ९०५, दिंडोरी ९०६, बागलाण ९१२, सिन्नर ९१६, नाशिक ९२२, कळवण ९२६, इगतपुरी ९३७, देवळा ९४७, नांदगाव ९४९, मालेगाव ९७७, त्र्यंबकेश्वर ९८०, चांदवड ९८९, पेठ ११७४ असे आहे.