युक्रेनमधील धरणफुटीमुळे जगात अन्नटंचाईची शक्यता; पाच लाख हेक्टरवरील शेती बाधित

युक्रेनच्या कृषी विभागाने पाण्याअभावी दक्षिण युक्रेनमधील पाच लाख हेक्टरवर जमिनीचे वाळवंटात रूपांतर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पुणे : युक्रेनमधील रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या खेरसन प्रांतातील काखोव्हका धरण फुटल्यामुळे जगभरात पुन्हा अन्नधान्य टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरणफुटीमुळे सुमारे पाच लाख हेक्टर क्षेत्र पाण्याअभावी बाधित होणार आहे. जलविद्युत केंद्राचे नुकसान झाल्यामुळे आणि अणुऊर्जा प्रकल्पाला पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्यामुळे उर्वरित शेतीलाही वीज पुरवठा करण्यातही अडथळा येणार आहे.

खेरसन प्रांतातील काखोव्हका धरण मंगळवारी, सहा जून रोजी फुटले. हे धरण युक्रेनचे जीवनवाहिनी होते. युक्रेनमध्ये सर्वात मोठे असलेल्या या धरणातून दक्षिण युक्रेनमधील सुमारे पाच लाख हेक्टरवरील शेतीला पाणी पुरवठा होत होता. ८०हून अधिक शहरे आणि गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता. धरणातील पाण्यावर जलविद्युत प्रकल्प सुरू होता, अणुऊर्जा प्रकल्पाला लागणाऱ्या पाण्याचा पुरवठाही युक्रेनमधून होत होता.

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार

युक्रेनच्या कृषी विभागाने पाण्याअभावी दक्षिण युक्रेनमधील पाच लाख हेक्टरवर जमिनीचे वाळवंटात रूपांतर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दक्षिण युक्रेनमध्ये प्रामुख्याने बार्ली, सूर्यफूल, गहू आणि मक्याचे उत्पादन घेतले जाते. सूर्यफूल पेंडीच्या जागतिक बाजारात युक्रेनचा वाटा ४० टक्के, सूर्यफूल तेलाच्या बाजारातील वाटा ३५ टक्के आणि गव्हाच्या जागतिक बाजारातील वाटा पाच टक्के आहे. युक्रेन प्रामुख्याने युरोपीयन देशांना अन्नधान्यांची निर्यात करतो.

 समृद्ध शेतीचे वाळवंट होणार

युक्रेनच्या कृषी आणि अन्न मंत्रालयाने धरणाच्या पाण्याअभावी हा सर्व शेती समृद्ध भाग वाळवंटात रूपांतरित होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. धरणातील पाण्यावर खेरसन प्रांतातील ९४ टक्के शेती, झापोरिझ्झियामधील ७४ टक्के शेती आणि डनिप्रो आणि निप्रॉपेट्रोव्स्कमधील ३० टक्के शेती अवलंबून आहे. डनिप्रो आणि झापोरिझ्झिया हे गहू आणि सूर्यफूल उत्पादन घेणारे प्रमुख प्रांत आहेत. खेरसन, ओडेसा आणि मायकोलायव्हमध्ये बार्ली, मक्याचे उत्पादन होते. खेरसन प्रांतातील दहा हजार एकर जमीन धरणाच्या पाण्याखाली गेली आहे. धरणाच्या पाण्यावर ३१ सिंचन योजनांद्वारे ५.८४ लाख हेक्टरवरील शेतीला पाणी दिले जात होते.

हे वाचले का?  कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला; भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांचा आरोप; वागणुकीवरही टीकास्रा

महागाईच्या झळा आणखी तीव्र

युक्रेन युरोपसह आफ्रिका आणि अरबी देशांना अन्नधान्यांचा पुरवठा करतो. धरण फुटताच शेती उत्पादनावर परिणाम होण्याच्या भीतीने शिकागो मर्चंटाइन एक्स्चेंजमध्ये गव्हाच्या दरात २.४ टक्क्यांनी वाढ होऊन ६.३० डॉलर प्रति बुशेल (२५ किलो) इतका झाला आहे. मक्याच्या किंमतीत एक टक्क्याने वाढ होऊन मका ६.०४ डॉलर प्रति बुशेल (२५ किलो) झाला आहे. अशीच वाढ बार्ली आणि ओट्सच्या किमतीत झाली आहे.