युक्रेन युद्धासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत रशियाविरोधातील प्रस्तावाच्या मतदानाला भारत गैरहजर राहिला होता.
रशियानं २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला चढवला आणि या दोन देशांमध्ये युद्धाला सुरुवात झाली. गेल्या दोन आठवड्यांहूनजास्त काळापासून हे युद्ध सुरू असून अजूनही त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायानं रशियावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले आहेत. मात्र, तरीदेखील युक्रेन युद्धात रशिया मागे हटायला तयार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये देखील रशियाविरोधात ठराव पारित करण्यात आला. यावेळी १४१ देशांनी युक्रेनच्या बाजूने मतदान केलं असताना भारत मात्र यावेळी गैरहजर राहिला होता. या पार्श्वभूमीवर रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाबाबत भारताची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता. त्यावर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
गुरुवारी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यातल्या चार राज्यांमध्ये भाजपाला सत्तास्थापनेसाठी आवश्यक बहुमत मिळवण्यात यश आलं आहे. पंजाबमध्ये आपनं बाजी मारली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजपा मुख्यालयात मतदार, उमेदवार आणि नेते-कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदींनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत देखील आपली भूमिका मांडली आहे.
भारताचे दोन्ही देशांशी संबंध!
दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी संबंध असल्याचं नमूद केलं. “युद्धात गुंतलेल्या दोन्ही देशांशी भारताचे आर्थिक, सुरक्षाविषयक, शिक्षणविषयक आणि राजकीय संबंध आहेत. या दोन्ही देशांसोबत भारताच्या अनेक गरजा निगडित आहेत”, असं मोदी यावेळी म्हणाले.
“युद्धाचा प्रत्येक देशावर परिणाम”
“सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध प्रत्येक देशावर परिणाम करत आहे. या युद्धात भारत शांततेच्या बाजूने आहे. भारताला आशा आहे की सर्व समस्यांवर चर्चेतून तोडगा काढला जाऊ शकतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं.
विरोधकांवर निशाणा
यावेळी पंतप्रधानांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला. “या लोकांनी ऑपरेशन गंगाला प्रादेशिक रूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रत्येक योजनेला प्रादेशिक आणि विशिष्ट समाजापुरतं संबंधित रुप देण्याचा प्रयत्न केला. भारतासाठी ही मोठी चिंतेची बाब आहे”, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर टीका केली.MORE STORIES ON