येवला मुक्तिभूमी स्मारकात विकासकामांचे नियोजन;छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथील मुक्तिभूमी स्मारक परिसरात प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय-वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, अतिथी निवासस्थान बांधणे आणि इतर सुविधा अशा एकूण १५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पालक मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

येवला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथील मुक्तिभूमी स्मारक परिसरात प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय-वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, अतिथी निवासस्थान बांधणे आणि इतर सुविधा अशा एकूण १५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पालक मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भुजबळ यांनी जगभरात केवळ धर्माच्या नावाने निर्माण झालेल्या राष्ट्रात कायमच उलथापालथ होत असताना भारतासारख्या खंडप्राय देशाला एकत्रित ठेवण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने केलेले असल्याचे सांगितले.
येवल्यातील मुक्तिभूमीवर बाबासाहेबांनी धर्मातराची घोषणा केली. रक्ताचा एक थेंब न सांडता देशातील सात कोटी लोकांमध्ये धर्मपरिवर्तन घडवून आणले. भारतीय राज्यघटना ही सर्वोत्तम आहे. मात्र ज्यांच्या हातात सत्ता जाईल ते या घटनेचा वापर कसा करतील त्यावर तिचे श्रेष्ठत्व ठरणार आहे. या राज्यघटनेला हात लावणे तर दूर, याकडे वाकडय़ा नजरेने बघण्याची कुणाची हिम्मत होता कामा नये. धर्माधर्मात वाद लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. द्वेष पसरविला जात आहे. लोकशाही व्यवस्थेला हे घातक आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांचा बळी जात आहे. अन्यायाविरुद्ध लढा लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला प्रेरणा देतात. त्यामुळे हेच आपले आदर्श असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी पार पडत असतांना सर्वात प्रथम मुक्तिभूमीच्या विकासाचे काम मंजूर करण्यात आले. मध्यंतरी कोरोना आर्थिक र्निबधामुळे हे काम थांबले होते. मात्र आता कोरोनानंतर पुन्हा पाठपुरावा करून या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पहिल्या टप्प्यात विश्वभुषण स्तुपाचे १३ कोटी किंमतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. राज्यातील वैभव असलेले हे शहर मुक्तिभूमीमुळे अधिक प्रसिद्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
येवला मुक्तिभूमी स्मारक परिसरात प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, संरक्षण भिंत, अॅकम्पीथिएटर, अतिथीगृह अशी विकास कामे करण्यात येऊन स्मारकाचा विकास करण्यात येत आहे. तळमजल्यावर १२ भिक्कू निवासस्थानांचे बांधकाम, प्रशासकीय कार्यालय, उपाहारगृह, स्वयंपाकघर, प्रसाधनगृह बांधण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर तीन भिक्कू पाठशाला, प्रत्येकी एक बैठकगृह, पाली आणि संस्कृत संशोधन केंद्र, ग्रंथालय, कलादालन, दृकश्राव्य कक्ष, प्रसाधन गृह बांधण्यात येणार आहे. दुसऱ्या मजल्यावर एकूण सहा बौद्ध भिक्कू विपश्यना केंद्रासाठी बांधकाम करण्यात येणार आहे. अॅंम्पीथिएटर बांधकाम, मंच, अतीमहत्वाच्या व्यक्तींसाठी कक्ष, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, वाहनतळ, उद्यान विकसित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी आमदार नरेंद्र दराडे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मायावती पगारे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश वाघ, प्रदेश उपायुक्त भगवान वीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर