राज्यपालांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी पक्ष कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

नाशिक : राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी पक्ष कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, असे विधान करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. या विधानाचे राज्यस्तरावर पडसाद उमटत असतांना शिवसेना याविषयी आक्रमक झाली आहे. बुधवारी येथे पक्ष कार्यालयाबाहेर राज्यपालांचा निषेध करीत विविध घोषणा देण्यात आल्या. या वेळी राज्यपालांच्या छायाचित्राला जोडे मारण्यात आले. याविषयी महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत असून त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. महाराजांचे गुरू जिजाऊ होत्या. त्यांनी त्यांना घडवल्याचे सांगितले. या वेळी पक्ष कार्यालयासमोर पदाधिकारी, कार्यकर्ते यांची गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली. आंदोलनकत्र्यांनी रस्त्यात ठिय्या दिल्याने या कोंडीत भर पडली. या सर्व प्रकाराकडे पोलीस केवळ बघ्याच्या भूमिकेत राहिले.

हे वाचले का?  पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग

करोना संसर्गाचे कारण देत आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाकारली जाते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठ कायद्या विरोधात ढोल बजाओ आंदोलन केले असता पोलिसांनी ढोल जप्त करत आंदोलकांना ताब्यात घेतले होते. काही वेळा पुतळा दहनाच्या वेळी पुतळा ताब्यात घेण्यात आला. राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारले जात असताना पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत राहिले. आंदोलकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असताना पोलिसांनी आंदोलकांना बाजूला केले नाही.