राज्यभरात गारठा; पुण्यात हुडहुडी

राज्यात सुरुवातीला विदर्भ आणि मराठवाडय़ातील तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली होती.

पुणे : कोरडय़ा हवामानाची स्थिती आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात सर्वत्र किमान तापमानाची घसरण कायम आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातील तापमानात किंचित वाढ झाली असली, तरी तेथे रात्रीचा गारवा आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, पुणे शहरात गुरुवारी राज्यातील नीचांकी ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

राज्यात सुरुवातीला विदर्भ आणि मराठवाडय़ातील तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली होती. चार ते पाच दिवसांपूर्वी या भागांत थंडीच्या लाटेची स्थिती होती. त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील तापमानाचा पाराही घसरला. कोकण विभागात मात्र दोन दिवसांपासून किमान तापमान सरासरीच्या खाली गेले आहे. या विभागांत मुंबईसह रत्नागिरी, अलिबाग परिसरात रात्रीचे तापमान सरासरीखाली आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे शहराचा पारा गुरुवारी घसरून थेट १० अंशांच्या खाली आला. त्यामुळे नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाचा नवा विक्रम नोंदविला गेला. नाशिक, जळगाव, सांगली आदी भागातही थंडी आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद, परभणी, बीड आदी भागांत तापमानाचा पारा घसरला आहे. विदर्भात किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली, तरी थंडी कायम आहे.

हे वाचले का?  Praniti Shinde : “…तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार थांबतील”, खासदार प्रणिती शिंदेंचं परखड मत

राज्यात सर्वच ठिकाणी सध्या किमान तापमान सरासरीच्या खाली आहे. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात रात्रीची थंडी कायम आहे. हवामानाची पुढील स्थिती लक्षात घेता तापमानात हळूहळू वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. दिवाळीच्या कालावधीत तापमानात किंचित वाढ अपेक्षित आहे.

किमान तापमान :  रत्नागिरी (१७.५), पुणे (९.८), जळगाव (१०.७), कोल्हापूर (१६.०), महाबळेश्वर (१३.४), नाशिक (१०.४), सांगली (१४.१), सोलापूर (१५.२), औरंगाबाद (१२.८), परभणी (१३.०), नांदेड (१५.५), बीड (१२.९), अकोला (१३.४), अमरावती (१४.१), बुलढाणा (१४.२), ब्रह्मपुरी (१९.६), चंद्रपूर (११.२), गोंदिया (१४.५), नागपूर (१८.३), वाशिम (१४.०), वर्धा (१६.८). (अंश सेल्सिअस)

हे वाचले का?  IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल