राज्यभरात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलींचे वारे

राज्यात पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची वाणवा आहे. गेल्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये महासंचालक कार्यालयाने योग्य समन्वय साधून अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे आचारसंहिता लागण्याची धाकधूक सुरु झाली आहे. त्यामुळे गृह विभागाने सतर्कता दाखवत राज्यभरातील बदलीच्या कक्षेत असलेले आणि आचार संहिताच्या नियमात बसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याची जोरात तयार सुरु केली आहे. काही पोलीस अधिकारी पसंतीच्या शहरात बदलीची ‘सेटिंग’ लावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राज्य पोलीस दलातील प्रत्येक जिल्ह्यात, आयुक्तालयात एकाच शहरात पाच पेक्षा जास्त वर्षांचा कालावधी किंवा एकाच विभागात तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना असतात. निवडणुकींवर प्रभाव पडू नये म्हणून कार्यकाळ पूर्ण करणारे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. भारतीय निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालक कार्यालयाला काही सूचना दिल्या होत्या. त्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसदर्भातही विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ८ जानेवारीला पोलीस महासंचालक कार्यालयातून आस्थापना विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांच्या सहिने एक पत्र प्रत्येक पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला (लोहमार्ग आणि मुंबई वगळून) पाठविण्यात आले.

हे वाचले का?  Sanjay Shirsat: भरत गोगावलेंचं मंत्रीपद संजय शिरसाटांमुळे हुकलं? ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण; शिंदे गटातली धुसफूस चव्हाट्यावर!

त्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक यांना १२ जानेवारीपर्यंत अधीनस्थ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली-पदस्थापनेबाबत कार्यवाही करावी लागणार आहे. परीक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक यांनी १२ ते १६ जानेवारीपर्यंत बदल्या किंवा पदस्थापना करावी. तसेच पोलीस आयुक्तांनाही 16 जानेवारीपर्यंत बदल्या संदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आता १६ जानेवारीपर्यंत राज्यभरातील पात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यामुळे जे पोलीस अधिकारी बदलीच्या कक्षेत किंवा बदली पात्र आहेत, त्यांनी गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयात ‘सेटींग’ लावण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

हे वाचले का?  Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोघांना उमेदवारी जाहीर; शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूरमधून…

राज्यात कनिष्ठ अधिकाऱ्यांची वाणवा

राज्यात पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची वाणवा आहे. गेल्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये महासंचालक कार्यालयाने योग्य समन्वय साधून अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र, वर्षभरात अनेक अधिकारी सेवानिवृत्त झाले किंवा अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्यामुळे अधिकाऱ्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे बदल्यासंदर्भात मोठा पेच निर्माण होणार आहे.

हे वाचले का?  सातारा : डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाखांचा दंड

अंतर्गत बदल्यांच्या हालचाली

काही पोलीस आयुक्तालयात आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अंतर्गत बदल्यांना सुरुवात झाली आहे. काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी तयार झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभाग तयारी करीत असून वरिष्ठ अधिकारीही अलर्ट मोडवर आले आहेत.