पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संगारेड्डीमध्ये सात हजार २०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले.
पीटीआय, हैदराबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संगारेड्डीमध्ये सात हजार २०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. तेलंगणच्या प्रगतीसाठी आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले की, राज्याचा विकास हाच देशाचा विकास या भावनेने आपण काम करतो.
मोदी आपल्या सरकारची कार्यप्रणाली विशद करताना म्हणाले की, ‘‘राज्य विकासाद्वारे राष्ट्र विकासाच्या मंत्रा’वर माझा विश्वास आहे. आज १४० कोटी भारतीय विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी दृढनिश्चय करत आहेत.’’ विकसित भारतासाठी आधुनिक पायाभूत सुविधा आवश्यक आहेत.
तेलंगणातील प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. मोदींनी हैदराबादमध्ये नागरी विमान वाहतूक संशोधन संस्थेच्या केंद्राचे उद्घाटन केले.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली. राष्ट्रीय महामार्ग-६५ च्या पुणे-हैदराबाद विभागाच्या २९ किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या सहा पदरी कामाचे भूमिपूजनही त्यांनी केले.
उज्जयिनी महाकाली मंदिरात प्रार्थना
संगारेड्डी येथील कार्यक्रमाला जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी येथील श्री उज्जयिनी महाकाली मंदिरात पूजा-प्रार्थना केली. आपण समस्त भारतीयांच्या कल्याणार्थ देवीकडे प्रार्थना केल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. यावेळी कडेकोट बंदोबस्त तैनात होता. यावेळी मंदिराच्या पुजाऱ्यांनी मोदींना देवीची प्रतिमा भेट दिली.