राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर; सरकारसमोर उत्पन्न वाढीचं आव्हान

राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार?

सुमारे एक लाख कोटींच्या तुटीच्या पार्श्वभूमीवर आज (८ मार्च) सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात उत्पन्न वाढीवर भर देण्यात येणार आहे. नवे कर लागू करून राज्याच्या तिजोरीत भर पडेल या दृष्टीने नियोजन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे सोमवारी दुपारी २ वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. करोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याने राज्याला यंदा खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर निधी उभा करावा लागला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मागील वर्षी अर्थमंत्री अजित पवार यांनी ९ हजार ५०० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला होता. करोनाचे संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच राज्यातील जनतेला आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून बऱ्याच अपेक्षा असल्याने सरकार अपेक्षापूर्ती करणार का? याकडेही लक्ष लागलेलं आहे.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार?

आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी सोमवारी सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून केंद्रातील भाजपा सरकारवर कुरघोडी करण्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांची योजना आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी भाजपावर कुरघोडी करण्याच्या उद्देशानेच पेट्रोल व डिझेलवरील करात काही प्रमाणात कपात करून राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न आहे. लिटरला दोन ते तीन रुपये करात सवलत देण्याचा प्रस्ताव असल्याचे समजते.