राज्यातील कोणत्याही गावातून थेट पंढरपूर गाठता येणार, आषाढी यात्रेसाठी एसटी पाच हजार विशेष बस सोडणार

यंदा आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांना एकत्रित मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबई : यंदा आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांना एकत्रित मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविकांनी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीने ५ हजार विशेष बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूर येथे जातात. अनेक प्रवासी स्वत:ची खासगी वाहने, रेल्वे, एसटी अथवा विविध दींडीसोबत चालत पंढरपूर गाठतात. यंदा भाविकांना थेट स्वत:च्या गावातून पंढरपूरपर्यंत बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. ४० पेक्षा जास्त भाविकांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात या प्रवासात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांना ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यांसारख्या सर्व सवलती लागू असणार आहेत. मागील वर्षी एसटीने आषाढीनिमित्त ४,२४५ विशेष बसगाड्या सोडल्या होत्या. त्यातून १८ लाख ३० हजार ९३४ भाविकांची सुखरूप ने-आण एसटीने केली होती.

हे वाचले का?  Gautam Adani : “गौतम अदाणींनी मविआ सरकार पाडलं, अजित पवारांची कबुली”, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला

या काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गांवर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे, अशा फुकट्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवून असणार आहेत.

हे वाचले का?  राज्यभरात थंडीची चाहूल, किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या खाली

एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेऊन लाखो भाविक आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात. अशा वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासात खोळंबा होतो. यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाबरोबरच ३६ पेक्षा जास्त काळ वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासनाला एसटीची मदत होणार आहे.

चार तात्पुरती बस स्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बस स्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक – प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.