राज्यातील निर्बंध शिथिल ; सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी २०० जणांच्या उपस्थितीची परवानगी

करोना नियंत्रणात आल्यामुळे राज्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला आहे.

मुंबई : करोनाची विशेषत: ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. त्यानुसार मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढू  लागताच सरकारने नववर्षांच्या पार्श्वभूमीवर ३० डिसेंबरपासून राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू केले होते. मात्र, त्यानंतरही ओमायक्रॉनचा धोका वाढू लागताच १० जानेवारीपासून दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचप्रमाणे लग्नसमारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध लागू करण्यात आले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील करोनाबाधितांचा आलेख घसरत आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेने सर्वोच्च शिखर बिंदू केव्हाच गाठला असून  आता ही लाट उतरणीला लागल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. राज्यातील करोनास्थिती नियंत्रणात आल्याचा दावा सरकारने उच्च न्यायालयातही केला आहे.

हे वाचले का?  महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “यावेळी काहीतरी…”

करोना नियंत्रणात आल्यामुळे राज्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला आहे. त्यानुसार शाळा- महाविद्यालये सुरू करण्यात आली असून आता अन्य निर्बंधही शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींची मर्यदा हटविण्यात आली असून, आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल. करमणूक पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेने, उपाहारगृह, नाटय़गृह, चित्रपटगृहे स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत ५० टक्के क्षमतेने, मनोरंजनात्मक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या २५ टक्के किंवा २००  लोकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आह़े

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; अजित पवार गट नाराज? म्हणाले, “आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं”

मुंबईची रुग्णसंख्या एक हजारच्या आत

मुंबई : मुंबईतील करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येतील घट कायम असून, सोमवारी ९६० नवे रुग्ण आढळल़े  २७ डिसेंबरनंतर प्रथमच मुंबईची दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारच्या आत नोंदविण्यात आली आह़े  आतापर्यंत मुंबईत १० लाख ४६ हजार ५९० करोनाबाधित आढळले आहेत. दरम्यान, राज्यात सोमवारी १५,१४० नवे रुग्ण आढळले, तर ३९ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात दिवसभरात ३५,४५३ रुग्ण करोनामुक्त झाले असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या २,०७,३५० इतकी झाली आहे.