राज्यातील २४६ औषध दुकानांना विक्री बंदीचे आदेश

अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील ३४६० दुकानांची तपासणी या काळात केली.

नोंदणीकृत विक्रेत्यांविनाच औषधांची विक्री

मुंबई : राज्यात नोंदणीकृत औषध विक्रेत्यांच्या (फार्मासिस्ट) अनुपस्थित औषधांची विक्री होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने १३ ते २० सप्टेंबर काळात राबविलेल्या धडक मोहिमेमध्ये आढळले आहे. या प्रकरणी दोषी आढळलेल्या २४६ दुकानांना औषधांची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील ३४६० दुकानांची तपासणी या काळात केली. यात २७७ दुकानांमध्ये नोंदणीकृत औषध विक्रेते अनुपस्थित असल्याचे आढळले आहे. या विक्रेत्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. यापैकी २४६ औषध विक्रेत्यांना औषधे विक्री बंद ठेवण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. सर्वाधिक तपासण्या कोकण विभागात केल्या असून त्या खालोखाल पुणे आणि मुंबईत केल्या आहेत.

हे वाचले का?  Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्याकडून…”

तर परवाने रद्द होतील..

एखाद्या दुकानात काही कालावधीसाठी नोंदणीकृत औषध विक्रेता नसल्यास त्यांनी त्या कालावधीत औषधांची विक्री करू नये व दुकान बंद ठेवावे. यापुढे नोंदणीकृत औषधविक्रेत्याच्या गैरहजेरीत वर्गीकृत औषधांची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

 ग्राहकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन

ग्राहकांनीसुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसार आणि विक्री बिलासह औषधांची खरेदी करावी असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. तसेच ग्राहकांना नोंदणीकृत औषधविक्रेत्याच्या गैरहजेरी बाबत काही तक्रार असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा स्थानिक संबंधित सह आयुक्त /सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात किंवा hqfdadesk13@gmail.com या इमेल वर तक्रार करावी.

हे वाचले का?  Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी