राज्यात पुन्हा लॉकडाऊन नाही; टोपेंची महत्त्वाची माहिती

पुणे: ‘राज्यात यापुढे पुन्हा ‘ लॉकडाऊन ‘ होणार नाही तर ‘ अनलॉक ‘च असेल’ असे स्पष्टीकरण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यात दिले. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझेशन अशा ‘एसएमएस’ प्रणालीसोबतच आपल्याला जगावे लागणार आहे, असे टोपे यांनी नमूद केले.

राज्यात चाचण्या होत नाहीत, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून देशाचा विचार केला तर पुण्यात आणि मुंबईत सर्वाधिक चाचण्या होत आहेत. मृत्यूदरही लपवला जात नसून सरकारकडून खरी माहिती जाहीर केली जात असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. जुलै, ऑगस्ट महिन्यांत करोना रुग्णांचा आकडा वाढू शकतो. त्या पार्श्वभूमीवर तयारी केली जात आहे. मात्र, लॉकडाऊन राहणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

हे वाचले का?  Social Media Ban for Kids : “लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार, ‘हा’ देश कायदा बनवण्याच्या तयारीत!

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. पुणे, सोलापूरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. बैठकीत करोना स्थितीवर सविस्तर चर्चा झाली. पुणे पिंपरीतील स्थितीचाही धावता आढावा घेण्यात आला. साडेतीन ते चार तास ही बैठक चालली. पुण्यातील सर्व खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

वाढत असलेली रुग्णसंख्या, उपचार, हॉस्पिटल संख्या, त्यातील बेड संख्या, खासगी हॉस्पिटल लावत असलेले शुल्क याबाबत बैठकीत चर्चा झाली. करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. यात लवकर निदान होणे गरजेचे असते. लक्षणे लपवू नका. शंका वाटल्यास लगेच तपासणी करून घ्या, असे आवाहन टोपे यांनी केले. हॉस्पिटलमधील बेडची संख्या पाहता जुलैमध्ये अडचण येणार नाही. त्यातही जर रुग्णसंख्या वाढत राहिली तर तशी व्यवस्था करावी लागेल. रुग्णालयांत ८०-२० टक्के हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सर्वत्र झाली पाहिजे. खासगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली व्यवस्था पाहण्यासाठी तसेच दर आकारणीवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष अधिकारी असला पाहिजे. त्यासाठी पावले टाकली जात आहेत, असेही टोपे यांनी नमूद केले.

हे वाचले का?  फुले दाम्पत्याच्या स्मारकातील शिलालेखात त्रुटी, ओळींमधून ‘शुद्र’ गायब

२४ तासांत करोना चाचणीचे अहवाल मिळाले पाहिजे. चाचण्या वाढल्या पाहिजेत. नवीन पद्धतीचा वापर केला पाहिजे. त्याबाबत दोन्ही पालिकांना सूचना करण्यात आली आहे, असे टोपे यांनी सांगितले. प्रत्येक खासदार, आमदाराने त्या भागातील जिल्हाधिकारी, आयुक्तांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे, असेही बैठकीत सांगण्यात आल्याचे टोपे म्हणाले.

सौजन्य :महाराष्ट्र टाईम्स

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नुसत्या प्रसिद्धीसाठी २०० कोटी मंजूर, काँग्रेसची आगपाखड; म्हणे, “ढोल पिटण्यासाठी…”!