राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता

राज्यातील मोसमी पावसाचा अधिकृत हंगाम सप्टेंबर महिन्यात संपला आहे.

पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी पुढील ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तर कोकण आणि गोवा, मराठवाडय़ात तुरळक पावसाची नोंद करण्यात आली.

राज्यातील मोसमी पावसाचा अधिकृत हंगाम सप्टेंबर महिन्यात संपला आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात मोठय़ा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस नोंदविला गेला. गुलाब चक्रीवादळाच्या अवशेषातून अरबी समुद्रात वायव्येला शाहीन चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. शाहीन चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचा परिणाम म्हणून राज्यात अनेक भागात सध्या पाऊस पडत आहे. गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तर कोकण आणि गोव्यासह मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.

हे वाचले का?  LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

कोकण आणि गोव्यातील म्हापसा, पणजी, पेडणे आणि दोडामार्ग, मध्य महाराष्ट्रातील अमळनेर, करमाळा, पारोळ, अक्कलकु वा, एरंडोल, साक्री, शिरपूर, तळोदा, गिरणाधरण, जामखेड, नांदगांव, चोपडा, धरणगांव, धुळे, जामनेर, कळवण, नंदुरबार, रावेर, सावली, सिंदखेड येथे एक सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. तर मराठवडय़ातील वाशी, भोकरदान, खुलताबाद, वैजापूर, वडवणी तर विदर्भातील सावली, मूल, चिमूर, भ्रदावती, चामोर्शी, हिंगणा, नागभीड या ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : ॲप आणि संकेतस्थळ बंद, लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया!

दरम्यान, पुणे आणि परिसरातही रविवारी सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. शहर आणि परिसरात पुढील दोन दिवसांत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून मेघगर्जनेसही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाटमाथा विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज आहे.