राज ठाकरेंच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष, भाषणात ‘या’ मुद्द्यांवर करणार भाष्य?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर होणार आहे, या भाषणात हे मुद्दे असण्याची शक्यता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावरून म्हणजेच मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावरून भाषण करणार आहेत. महाराष्ट्रातलं राजकारण, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी या सगळ्या विषयांवर ते आपल्या ठाकरी शैलीत भाष्य करणार आहेत. राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा हा दरवर्षी लक्षवेधीच असतो. कारण राज ठाकरे जेव्हा भाषण करतात तेव्हा महाराष्ट्रात पुढचे किमान चार दिवस त्याची चर्चा होते.

आज काय बोलू शकतात राज ठाकरे?

२१ जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि ते शिवसेनेतलं आजवरचं सर्वात मोठं बंड मानलं जातं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार गेले आहेत. तसंच १३ खासदारही त्यांच्यासोबत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या कृतीमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना खिळखिळी झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही उरलेलं नाही कारण निवडणूक आयोगाने तेदेखील एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. या सगळ्या मुद्द्यावर राज ठाकरे भाष्य करू शकतात.

उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवणार?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे कोसळलं. त्यावेळी राज ठाकरेंनी “एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वतःचं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो.” असं ट्विट राज ठाकरेंनी केलं होतं. या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव कुठेही घेण्यात आलेलं नव्हतं मात्र उद्धव ठाकरेंकडेच या ट्वीटचा रोख होता. जून ते मार्च इतक्या कालावधीतही हे ट्वीट लोकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत जाणं, त्यांचं मुख्यमंत्रीपद आणि त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागणं हे सगळे विषय राज ठाकरेंच्या अजेंड्यावर असू शकतात. बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र हे विधानभवनात लावण्यात आलं. त्या सोहळ्याला निमंत्रण असूनही उद्धव ठाकरे गेले नव्हते. यावरही राज ठाकरे बोलू शकतात.

हे वाचले का?  राज्यातील ‘या’ प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले, आता ‘आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ म्हणून ओळखले जाणार

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी तडजोड केली ही टीका त्यांच्यावर सातत्याने होत असते. अशात शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यापासून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं एकनाथ शिंदे सातत्याने सांगताना दिसत आहेत. याच मुद्द्यावर आज राज ठाकरेही भाष्य करू शकतात. गेल्या वर्षी पुण्यात राज ठाकरेंनी एक छोटेखानी भाषण केलं होतं. त्यामध्येही त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात आहोत असं म्हटलं होतं. तसंच बाळासाहेब ठाकरेंच्या आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचे वारसदार आपणच आहोत असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. यावर आज राज ठाकरे भाष्य करू शकतात.

हे वाचले का?  पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शन रांगेसाठी ‘ स्कायवॉक ‘, १२९ कोटी खर्चाच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता

महाविकास आघाडीवर टीका

महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या कार्यकाळात काय काय घडलं? काय गोष्टी घडायला हव्या होत्या? या सगळ्यावरून अजित पवार, शरद पवार, अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या सगळ्यांवर राज ठाकरेंची ठाकरी तोफ धडाडू शकते.

निवडणुकांसाठी तयार राहण्याचं आवाहन

विविध मुद्द्यांना स्पर्श करत असतानाच राज ठाकरे हे आपल्या भाषणांतून निवडणुकांसाठी तयार राहा असंही कार्यकर्त्यांना सांगू शकतात. सत्ता आपल्याला मिळेल हे मळभ दूर होईल असा विश्वास राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच्या आपल्या भाषणात व्यक्त केला होता. तर सध्या आम्हाला १० वी नापास असल्यासारखं वाटतं आहे कारण निवडणुका कधी लागतील असं विचारलं की दोनच महिने सांगितले जातात मार्च आणि ऑक्टोबर गेल्या काही दिवसांपासून हेच चाललंय असं राज ठाकरे महाराष्ट्र शाहीर या टिझर लाँचच्या वेळी मिश्किलपणे म्हणाले होते. महापालिका निवडणूक आणि आगामी काळात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणणुका या अनुषंगाने राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय सांगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

छत्रपती संभाजी नगरचा मुद्दा

मनसेने मागच्या आठवड्यात औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजी नगर हे नाव करण्यास मंजुरी मिळाल्याच्या समर्थनार्थ औरंगाबादमध्ये मोर्चा काढला होता. या मोर्चाला पोलिसांनी संमती नाकारली होती तरीही हा मोर्चा निघाला ज्यानंतर पोलिसांनी कारवाई करून मनसेच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी छत्रपती संभाजी नगरमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. या अनुषंगानेही आज राज ठाकरे त्यांच्या भाषणात काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हे वाचले का?  ‘आनंदाचा शिधा’ योजनेत पारदर्शकता; ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी संपुष्टात; ठेका मिळविण्यासाठी नऊ कंपन्या स्पर्धेत

टिझरमध्ये काय काय?

राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याचे विविध टिझरही ट्वीटरवरून ट्वीट करण्यात आले आहेत. ‘हिंदू ही दोन अक्षरं जगा’ ‘मराठी या तीन अक्षरांवर प्रेम करा’ ‘महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा’ राज ठाकरे ही पाच अक्षरं नेहमीच पाठिशी असतील हे सांगणारा टिझर १७ मार्चला पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर एकामागोमाग एक टिझर पोस्ट करण्यात आले आहेत. ‘महाराष्ट्रालाच नव्हे तर राजकारणालाही नवनिर्माणची गरज’ हे सांगणारा दुसरा टिझर यानंतर पोस्ट करण्यात आला.