राम मंदिरासाठी खंडणीचा आरोप

वर्ध्यातील प्रकार, खासगी शिकवणी वर्ग संचालक संघटनेकडून निषेध 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाने शिवीगाळ करीत राम मंदिर बांधकामासाठी देणगीच्या नावे खंडणी मागितल्याचा आरोप शिकवणी वर्ग संचालकाने केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, खासगी शिकवणी वर्ग संचालक संघटनेने या प्रकाराचा निषेध म्हणून दोन दिवस वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरोप झालेल्या जिल्हाध्यक्षांनी संचालकाविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.

वर्धा येथील ‘प्रिझम अकॅडमी’ या शिकवणी वर्गाचे संचालक पराग राऊत यांनी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष वरुण पाठक यांच्या विरोधात हा खंडणीवसुलीचा आरोप केला. ते म्हणाले, वरुण पाठक या व्यक्तीने मंदिर कार्यासाठी १ लाख २१ हजार रुपयांची मागणी केली. मात्र ५ हजार रुपयांचीच पावती मिळेल असेही बजावले. मी नकार दिल्यावर त्याने शिकवणी वर्गात काही झाले तर मी जबाबदार राहणार नाही, अशी धमकी दिली. तरीही मी नकारच दिल्याने त्याने माझ्या घरापुढे काही मुलांसह येऊन घोषणाबाजी केली. मी घरी नसताना पत्नी व मुलीशी अरेरावी केली. असा प्रसंग इतरांवर येऊ नये, म्हणून सहकार्य करावे अशा आशयाची पोस्ट राऊत यांनी आपल्या सहकाऱ्यांना समाजमाध्यमातून केली.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

या घडामोडीबाबत वारंवार संपर्क साधूनही राऊत यांनी बोलणे टाळले. ते आईच्या उपचारार्थ नागपुरात असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र खासगी शिकवणी वर्ग संचालक संघटनेचे विशाल उराडे म्हणाले, धमकी देण्याची बाब गंभीर आहे. त्याचा निषेध म्हणून शिकवणी वर्ग बंद ठेवले जाणार आहेत.

निधी संकलन उपक्रमाचे संयोजक शिवाजी अडसड यांनी बांधकाम निधी संकलन उपक्रमाशी पाठक यांचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले. संकलनाची कार्यपद्धती ठरलेली आहे. तिघांच्या उपस्थितीतच देणगी मागता येते. पावती पुस्तकांची नोंद असते. कुणीही देणगी मागू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे वाचले का?  सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल

राऊत यांनी शिकवणी वर्ग चौकाला त्यांच्या प्रिझम अकादमीचे नाव दिल्याने आपण जाब विचारला होता. परंतु मी माफी मागणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, असे उर्मट उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आम्ही कुटुंबाशी अजिबात वाद घातला नाही. या घटनेची चित्रफीत उपलब्ध आहे. यामुळे माझाच नाही तर समस्त रामभक्तांचा अपमान झाला आहे. निधी संकलन अभियानाला मुद्दाम गालबोट लावण्याचा हा प्रकार आहे.

हे वाचले का?  “हिंदुंनो परत जा”, अमेरिकेत मंदिराची विटंबना; दहा दिवसांतील दुसरी घटना

– वरुण पाठक, जिल्हाध्यक्ष, भाजयुमो