‘लव्ह जिहाद’च्या कायद्याबाबत अभ्यास; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेगवेगळय़ा राज्यांनी काय कायदे केले आहेत याचा तज्ज्ञांच्या माध्यमातून अभ्यास केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नागपूर : राज्यात ‘लव्ह जिहाद’चा कायदा आणण्याबाबत पडताळणी केली जात आहे. याबाबत राज्य सरकारने अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. पण, वेगवेगळय़ा राज्यांनी काय कायदे केले आहेत याचा तज्ज्ञांच्या माध्यमातून अभ्यास केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस शुक्रवारी नागपुरात आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.  श्रद्धा वालकर प्रकरणामुळे ‘लव्ह जिहाद’वरही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायदा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत  विचारले असता फडणवीस म्हणाले,  अन्य राज्याच्या कायद्याचा अभ्यास केला जाणार आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात सध्या हा विषय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 महाविकास आघाडीच्या काही खासदारांनी आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. याबाबत फडणवीस म्हणाले,  महाराष्ट्राच्या हितासाठी, राज्याचे प्रश्न मांडण्यासाठी कुणीही भेटत असेल तर उत्तमच आहे. शिंदे गटाचे खासदार स्वतंत्रपणे नरेंद्र मोदींना भेटले आहेत. ते भेटतच असतात. त्यामुळे पुन्हा यांच्यासोबत त्यांनी जायला पाहिजे, असे काही नाही असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘ठाकरे सरकारमुळे प्रकल्प रखडले’

 नागपूर मेट्रो आणि नागनदी या दोन प्रकल्पांना केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून हे प्रकल्प ठाकरे सरकारमुळे रखडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. राज्यात आमचे सरकार होते त्यावेळी आम्ही दोन प्रकल्पांचे नियोजन केंद्राकडे पाठवले होते. त्यात नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. २०१९ साली हे प्रकल्प मान्यतेच्या पातळीवर आले तेव्हा केंद्राला काही छोटय़ा शंका होत्या. पण महाविकास आघाडीने त्या शंकांचेही निरसन न केल्यामुळे दोन-अडीच वर्षे हे दोन्ही प्रकल्प रखडल्याचे फडणवीस म्हणाले.

हे वाचले का?  Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त

श्रद्धाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या; विकास वालकर यांची मागणी

मुंबई : श्रद्धा वालकर हिची हत्या करणारा आरोपी आफताब पूनावालाला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच आफताबच्या कुटुबीयांची चौकशी करून या प्रकरणातील दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. तसेच श्रद्धाने आमच्या विरोधात जाऊन ‘डेटिंग अ‍ॅप’वर संपर्कात आलेल्या आफताबवर विश्वास ठेवला. त्यामुळे अशा ‘अ‍ॅप’वर सरकारचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर १८ वर्षांवरील मुलांना दिलेल्या स्वातंत्र्याचाही पुनर्विचार करावा, अशी मागणीही विकास वालकर यांनी यावेळी केली.  

वसईतील श्रद्धा वालकरची (२६) प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याने दिल्लीत हत्या केल्याचे प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. याप्रकरणी, श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांसमोर व्यथा मांडली. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या उपस्थित होते. पालकांच्या विरोधाला न जुमानता डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या आफताबवर श्रद्धाने विश्वास ठेवला आणि ती त्याच्याबरोबर राहत होती. या घटनेला ‘डेटिंग अ‍ॅप’ही जबाबदार आहे. त्यामुळे अशा ‘अ‍ॅप’वर सरकारचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. तसेच १८ वर्षांनंतर मुलांना त्याचे हक्क मिळतात आणि ते पालकांना जुमानत नाहीत. मुलांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

हे वाचले का?  Narendra Modi : मोदींचं पोलंडमध्ये मराठीतून भाषण! कोल्हापूर स्मारकाला भेट देऊन म्हणाले, “छत्रपती घराण्याने पोलिश महिला व मुलांसाठी…”

पत्नी आणि मी विभक्त झालेलो नाही. आजारी आईची शुश्रूषा करण्यासाठी तिच्यासोबत होतो, असे विकास वालकर यांनी स्पष्ट केले. श्रद्धा हत्याप्रकरणी दिल्लीचे राज्यपाल, दिल्लीमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तपास योग्य दिशेने सुरू आहे. माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, असे विकास वालकर म्हणाले.

वसई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न..

वसईतील तुळिंज आणि मणिपूर पोलिसांनी सहकार्य केले असते, तर माझी मुलगी आज जिवंत असती. पोलिसांच्या असहकार्यामुळे मला त्रास सहन करावा लागला. त्यामुळे संबंधित पोलिसांची चौकशी करणे आवश्यक आहे, असे विकास वालकर म्हणाले. दरम्यान, विकास वालकर यांनी केलेले आरोप वसई पोलिसांनी फेटाळले. आमचा तपास आणि श्रद्धाच्या अर्जावर केलेली कारवाई योग्य होती. कुठेही हलगर्जीपणा झाला नाही, असे पोलिसांनी सांगितले.  

हे वाचले का?  Aparajita Woman and Child Bill : बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी; पश्चिम बंगाल सरकारचं नवं विधेयक

दीड वर्षांपूर्वी शेवटचा संवाद..

श्रद्धा माझ्याशी कधी फोनवर जास्त वेळ बोलत नव्हती. २०२१ मध्ये आमचे बोलणे झाले होते, तेव्हा ती बंगळूरुमध्ये राहात होती. त्यावेळी तिने तिच्या भावाची आणि इतरांची विचारपूस केली. त्यानंतर आमचे कधी बोलणे झालेच नाही. २३ सप्टेंबर २०२२ रोजी मी पोलिसांना भेटायला गेलो आणि माझी तक्रार ३ ऑक्टोबरला नोंदवण्यात आली. अनेक वेळा श्रध्दाच्या मित्र-मैत्रिणीकडे विचारपूस करीत होतो, परंतु काहीच उत्तर मिळत नव्हते. आफताबच्या आईकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. श्रद्धाच्या मित्र-मैत्रिणींनी मला कधीच काही सांगितले नाही. श्रद्धाने २०१९ मध्ये पोलिसांत तक्रार केली, तेव्हाही मला काहीच माहिती नव्हते किंवा पोलिसांनी मला कोणतीही माहिती दिली नाही, असे ते म्हणाले.