लष्कराच्या हवाई प्रशिक्षणात नाशिक केंद्रस्थानी

आर्मी एव्हिएशन स्कूलचा (कॅट्स) दीक्षान्त सोहळा बुधवारी सकाळी आर्मी एव्हिएशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

लवकरच नवे प्रशिक्षण केंद्र, ड्रोन प्रशिक्षणास सुरुवात; कोम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलच्या सोहळय़ात हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिके

नाशिक : लष्कराच्या हवाई दलाची हेलिकॉप्टर वैमानिकांची निकड पूर्ण करणाऱ्या कोम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलच्या जोडीला आता लवकरच स्थानिक पातळीवर आर्मी एव्हिएशन प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. मानवरहित अर्थात दूर संवेदनाद्वारे संचालित विमानांनी (ड्रोन) युद्धास विलक्षण परिमाण लाभते. त्याचे प्रशिक्षणही स्कूलमार्फत देण्यास सुरुवात झाली आहे. झाशीपाठोपाठ बंगळूरु येथील प्रशिक्षण केंद्रही  नाशिकच्या स्कूलमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. या घटनाक्रमाने लष्कराच्या हवाई प्रशिक्षणात नाशिक केंद्रस्थानी आल्याचे अधोरेखित झाले आहे.

गांधीनगर येथील आर्मी एव्हिएशन स्कूलचा (कॅट्स) दीक्षान्त सोहळा बुधवारी सकाळी आर्मी एव्हिएशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कोम्बॅक्ट एव्हिएटर्स प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणारे ३७ अधिकारी वैमानिक म्हणून लष्करी हवाई दलात दाखल झाले. यात हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कॅप्टन अभिलाषा बराक या देशातील पहिल्या महिलेचाही समावेश आहे. या वेळी सुरी यांनी कॅट्स आणि दलाच्या कामगिरीचा आढावा घेतला. लष्करी हवाई प्रशिक्षण केंद्रासाठी नाशिकची निवड झाली असून लवकरच ते कार्यान्वित होईल. हवाई प्रशिक्षणातील कमतरता भरून काढण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. त्याअंतर्गत नाशिकमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. स्कूलमध्ये मानवरहित विमान संचालन प्रशिक्षणासाठी स्वतंत्र शाखा स्थापन करण्यात आली आहे. अलीकडेच झाशी येथील प्राथमिक प्रशिक्षण केंद्र (बॅट्स) नाशिकला हलविण्यात आले. बंगळूरु येथील रोटरी विंग प्रबोधिनीतील (आरडब्लूए) प्रशिक्षणही नाशिकच्या स्कूलमध्ये समाविष्ट होईल. कॅट्सच्या अंतर्गत प्रगत प्रशिक्षणासाठी अतिरिक्त शाखेची निर्मिती केली जाईल, असे सुरी यांनी नमूद केले.

हे वाचले का?  त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे दिवाळी पाडव्यापासून ऑनलाईन दर्शन सुविधा

आधुनिक उपकरणांनी रात्री वा कमी प्रकाशातील कारवाईतील अडसर दूर झाले आहेत. आता दल अहोरात्र कुठल्याही भागात मोहिमा राबवू शकते. हल्ला करण्याची क्षमता राखणारे अपाचि हेलिकॉप्टर दाखल होत असून २०२४ पर्यंत त्यांची तुकडी तयार होईल. सीमेवरील आव्हाने लक्षात घेऊन रुद्र आणि हलक्या वजनाचे एएलएल यांच्या तुकडय़ा वाढविल्या जात आहेत. जुनाट चिता आणि चेतक हेलिकॉप्टरची जागा देशांतर्गत निर्मिलेल्या हलक्या वजनाच्या एएलएचच्या वेगळय़ा श्रेणीतील विमानांना दिली जाईल. देशासह आघाडीवरील क्षेत्रात दलाचे तळ उभारून क्षमता वृिद्धगत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. दीक्षान्त सोहळय़ात समरप्रसंगाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यात ध्रुव, चिता आणि चेतक हेलिकॉप्टरने सहभाग नोंदविला. उन्हाळी सुट्टीमुळे सोहळय़ास चांगलीच गर्दी झाली होती. हेलिकॉप्टरच्या कसरती टिपण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती.

हे वाचले का?  इगतपुरीत सरासरी पावसात लक्षणीय घट, नाशिकमध्ये आतापर्यंत ७४८ मिलिमीटरची नोंद

सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा सन्मान

प्रशिक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल कॅप्टन आशीष कटारिया यांना सिल्व्हर चीता, उत्कृष्ट हवाई उड्डाणाबद्दल कॅप्टन एस. के. शर्मा, तर हवाई निरीक्षणाबद्दल कॅप्टन श्रवण मणिलथया पीएम यांना चषकाने सन्मानित करण्यात आले. पूर्व सैन्य अभ्यासक्रमात अव्वल राहिलेल्या कॅप्टन अभिलाषा बराक यांना तर गोळीबारीतील कामगिरीबद्दल कॅप्टन आर. के. कश्यप यांनाही चषक प्रदान करण्यात आला.

हे वाचले का?  भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन