लसीकरणासाठी आरोग्य पथकांची रात्रंदिन धडपड; उन्हाळी सुट्टीआधीच विद्यार्थ्यांसाठी नियोजन

करोनाची तिसरी लाट ओसरल्याने निर्बंध शिथिल होत असले तरी पुढील संभाव्य धोके टाळण्यासाठी आरोग्य पथके लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी धडपड करीत आहेत.

हळदी समारंभ ते कीर्तन कार्यक्रमापर्यंत..

नाशिक : करोनाची तिसरी लाट ओसरल्याने निर्बंध शिथिल होत असले तरी पुढील संभाव्य धोके टाळण्यासाठी आरोग्य पथके लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी धडपड करीत आहेत. सुट्टीच्या दिवशी अतिदुर्गम पाडय़ांवर शिबिरांच्या आयोजनापासून ते रात्रीच्या वेळी हळदी समारंभ वा कीर्तन कार्यक्रमात जाऊन नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. शाळांना उन्हाळी सुट्टी लागण्याआधी १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सत्राचे आयोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत

प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात १५ वर्ष वयोगटापुढील ५५ लाख १९ हजार सात जण लसीकरणास पात्र आहेत. त्यातील ४७ लाख २३ हजार ९८६ म्हणजे ८५.५९ टक्के जणांनी पहिली मात्रा घेतली आहे. दोन्ही मात्रा घेणाऱ्यांची संख्या ३५ लाख १९ हजार ७४६ (६३.७७ टक्के) आहे. नऊ लाख ७५ हजार १७५ व्यक्तींना अद्याप दुसरी मात्रा देणे बाकी आहे. या जोडीला १२ ते १४ वयोगटातील लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रशासन आरोग्य पथकांच्या सहकार्याने विविध पातळीवर प्रयत्नरत असल्याचे जिल्हाधिकारी तथा करोना लसीकरण घटना व्यवस्थापक गणेश मिसाळ यांनी सांगितले.

हे वाचले का?  अनुसूचित जमातींमधून आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदोलन

शक्य ते सर्व उपाय केले जात आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी आरोग्य पथके सक्रिय असतात. गेल्या रविवार पेठ तालुक्यातील अतिदुर्गम झरी आणि बेहेडपाडा येथे लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाटीलवाडी येथे विवाह सोहळा असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पथक आदल्या दिवशी रात्री हळदी समारंभात पोहोचले. तिथे १९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. िदडोरी तालुक्यातील ननाशी येथे कीर्तनाच्या कार्यक्रमात आरोग्य पथक धडकले. तिथे एकाच वेळी कीर्तन आणि लसीकरणही झाले. त्र्यंबकेश्वर तालुक्यात साधू-महंताच्या लसीकरणातून आदिवासी भागातील नागरिकांची भीती कमी केली जात आहे. मुळेगाव वाडी येथील महंत देवगिरी जगतगिरी महाराजांना दुसरी मात्रा देण्यात आली. मालेगावमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढत असले तरी म्हणावा तसा जोर पकडलेला नाही.

हे वाचले का?  नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा

शाळानिहाय लसीकरण सत्रांचे आयोजन

१२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी उन्हाळी सुट्टी लागण्याआधी शाळांमध्ये लसीकरण सत्रांचे आयोजन करावे, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. लसीकरण लाभार्थ्यांचा हा समूह एकत्र शाळेत असल्याने एकाचवेळी त्यांचे लसीकरण शक्य आहे. त्यामुळे शाळांनी या वयोगटाच्या लसीकरणासाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र ,शहरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे सत्र आयोजित करावे, असे शिक्षणाधिकारी डॉ. मिच्छद्र कदम आणि राजीव म्हसकर यांनी म्हटले आहे. याबाबतची सूचना जिल्ह्यातील सर्व शाळांना दिली गेली आहे. शाळांना सुट्टी लागण्याआधीच सत्र आयोजित करावे, आपल्या शाळेतील १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

हे वाचले का?  द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या महिलेस दिल्लीत अटक