महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेसाठी लातूर येथे केंद्र मंजूर झाले आह़े.
लातूर : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेसाठी लातूर येथे केंद्र मंजूर झाले आह़े. वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून हे केंद्र मंजूर झाले. दरम्यान, राज्य नाटय़ स्पर्धेच्या लातूर केंद्राचे वेळापत्रक जाहीर झाले असून २१ ते २६ फेब्रुवारी दरम्यान मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात दररोज सायंकाळी सात वाजता विविध नाटकांचे सादरीकरण होणार आह़े.
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेचे लातूरला केंद्र व्हावे, ही लातूर जिल्ह्यातील नाटय़ कलावंत, नाटय़ रसिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती़. त्याचा विचार करून हे केंद्र मंजूर झाले आह़े. लातूरला केंद्र नसल्याने लातूरच्या कलावंतांना सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड अशा केंद्रांवर जाऊन नाटय़कृती सादर करावी लागत होती़. लातूरच्या प्रेक्षकांनाही स्पर्धेत सादर होणारी नाटके पाहता येत नव्हती. या नाटकांचा जास्तीत जास्त नाटय़ रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे यांनी केले आह़े.
सादर होणारी नाटके
२१ रोजी बाळकृष्ण धायगुडे लिखित व प्रदीप भोकरे दिग्दर्शित ‘तोच़़ पण गोष्ट निराळी’, २२ रोजी अभय राठोड लिखित व दिग्दर्शित ‘राजा हरिश्चंद्र’, २४ रोजी विभाकर मिरजकर लिखित व अनिल कांबळे दिग्दर्शित ‘व्यक्त अव्यक्त’, २५ ला शिल्पा नवलकर लिखित व संपदा कुलकर्णी दिग्दर्शित ‘सेल्फी’ तर २६ फेब्रुवारी रोजी पांडुरंग वाघमारे लिखित व कल्याण वाघमारे दिग्दर्शित ‘तु याव.’