लेखानगर चौकात सैन्याच्या शौर्याचे प्रतीक लवकरच विराजमान

भारत-पाकिस्तान युद्धात वापरलेला टी ५५ रणगाडा मुंबई-आग्रा महामार्गावरील येथील लेखानगर चौकात ठेवण्याचे रखडलेले काम लवकरच मार्गी लागणार आहे.

पुण्याहून टी ५५ रणगाडा शहरात दाखल

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : भारत-पाकिस्तान युद्धात वापरलेला टी ५५ रणगाडा मुंबई-आग्रा महामार्गावरील येथील लेखानगर चौकात ठेवण्याचे रखडलेले काम लवकरच मार्गी लागणार आहे. पहाटे हा रणगाडा शहरात दाखल झाला आहे.

तोफखाना स्कूल, वैमानिक प्रशिक्षण केंद्र, हवाई दलाचे देखभाल दुरुस्ती केंद्र आणि सुखोई विमानांची बांधणी अशा लष्करी कार्यालयांचे सान्निध्य लाभलेल्या शहरात शौर्याचे प्रतीक उभारण्याची संकल्पना सिडकोतील प्रभाग क्रमांक २४चे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी मांडली होती. त्यास महापालिका, सिडको प्रशासन आणि संरक्षण विभागाची मान्यता मिळाली. रणगाडा ठेवण्याविषयी कार्यादेश झाले. यासाठी महापालिका निधी खर्च करणार नाही. सामाजिक दायित्व निधीतून हे काम केले जाणार आहे. त्यानुसार निश्चित जागेत हे काम अनेक महिने लोटूनही सुरू झाले नाही. मार्च २०१९ मध्ये ते मंजूर झाले होते.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

लष्कराच्या पुणे केंद्रातून तो रणगाडा विशिष्ट कालावधीत आणण्याची मुदत होती. ज्या जागेवर रणगाडा ठेवला जाणार आहे, तिथे चबुतरा उभारून देण्याची पालिकेची जबाबदारी आहे. हे काम रखडण्यामागे स्थानिक वादग्रस्त राजकीय पुढारी, त्याच्या कार्यकर्त्यांचा अडथळा असल्याचा आरोप तिदमे यांनी केला होता.

महापालिकेच्या उपरोक्त जागेत संबंधितांची वाहने मोठय़ा संख्येने उभी राहतात. ही संकल्पना प्रत्यक्षात आल्यावर वाहनांना जागा मिळणार नाही, या कारणास्तव उपरोक्त कामास विरोध होत असल्याचे सांगितले जाते. परिसरात बीअर बारदेखील आहे. यामुळे कामगार कामासाठी उपरोक्त ठिकाणी गेले की, समाजकंटक धमकावत संबंधितांना पिटाळून लावतात.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

या प्रश्नी तिदमे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने पोलीस सुरक्षा व्यवस्थेत काम करण्याचे संकेत दिले होते. लेखानगर चौकातील पालिकेच्या त्रिकोणी जागेत युद्धात वापरलेला रणगाडा ठेवला जाणार आहे. वाहतूक पोलीस शाखेने आधीच त्यास नाहरकत दाखला दिला आहे.

बुधवारी पुणे येथून ४० टन वजन असलेला हा रणगाडा महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला. गुरुवारी पहाटे तो शहरात दाखल झाल्याचे तिदमे यांनी सांगितले. जिथे हा रणगाडा ठेवला जाणार आहे, तेथील काम सध्या पूूर्ण झालेले नाही. यामुळे सध्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी बाजारामागील क्रीडांगणात रणगाडा उतरविण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत लेखानगर चौकात काम पूर्ण झाल्यानंतर रणगाडा तिथे ठेवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली