वांगण बारीतून वाहतूक पूर्ववत; दरडसह चिखल हटविण्यात यश

गुजरातला जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने दोन्ही बाजूकडील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

नाशिक – सुरगाणा तालुक्यात सततच्या पावसामुळे गुजरातला जोडणाऱ्या सुरगाणा – वासदा या महामार्गावर उंबरठाणजवळील वांगण बारीत शुक्रवारी दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत दखल घेत जेसीबीच्या सहाय्याने बारीतील ढिगारा बाजूला केल्यानंतर अडीच तासांनी वाहतूक पुन्हा सुरु झाली.

महिनाभरापासून सुरगाणा शहरासह तालुक्यात कमीअधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्ते खराब झाले आहेत. उंबरठाण परिसरात देखील पावसाचे सातत्य असल्याने येथून दोन किलोमीटर अंतरावरील वांगण बारीत शुक्रवारी पहाटे दरड कोसळून रस्त्यावर चिखल पसरला. रस्त्यावर झाडे देखील पडली. गुजरातला जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने दोन्ही बाजूकडील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. याची माहिती बांधकाम विभागाला मिळताच या विभागाचे अधिकारी जगदीश वाघ, हर्षल पाटील आणि कर्मचारी यांनी तत्काळ जेसीबीच्या सहाय्याने बारीतील ढिगारा बाजूला केल्यावर सुमारे अडीच तासांनी वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला. दुसरीकडे, सुरगाण्यापासून जवळच असलेल्या खोकरी येथे संततधारेमुळे जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली जमीनदोस्त झाली आहे. खोकरी येथे जिल्हा परिषद शाळेच्या एक ते आठ वर्ग खोल्या आहेत. यापैकी एक वर्ग खोली कोसळली आहे. सुदैवाने हा प्रकार रात्री घडल्याने मोठा अनर्थ टळला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हे वाचले का?  Manoj Jarange Patil Rally : मनोज जरांगे यांच्या फेरीचा शांततेत समारोप