विद्यार्थ्यांच्या समस्यांना उत्तर देण्यासाठी MPSC ने सुरु केलं ट्विटर हँडल, पण…

विद्यार्थ्यांना अधिकृत अपडेट्स देण्यासाठी MPSC ने ट्विटर हँडल सुरु केलं खरं. पण, आपल्या पहिल्याच ट्विटला…

महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयाचे अर्थात एमपीएससीचं (MPSC) अधिकृत ट्विटर हँडल सुरु करण्यात आलं आहे. शुक्रवारी (२७ ऑगस्ट) संध्याकाळी याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या ट्विटर हॅण्डलवरून महत्त्वाची प्रसिद्धीपत्रकं, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध करण्यात येतील, अशी देखील माहिती देण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना अधिकृत अपडेट्स देण्यासाठी सुरु केलेल्या या हँडलने आपल्या पहिल्याच ट्विटला रिप्लायचा ऑप्शन बंद करून ठेवला आहे. त्यामुळे, एमपीएससीचं हे ट्विटर हँडल सुरु झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आतच टीकेचं धनी झालेलं पाहायला मिळत आहे.

हे वाचले का?  नाशिक : नाल्यामुळे हर्षवाडीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळण्यासाठी एमपीएससीकडून हा रिप्लायचा ऑप्शन बंद करण्यात आल्याची टीका होताना पाहायला मिळत आहे. “विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना तुम्ही घाबरताय का?”, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. करोनामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या परीक्षा आणि नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मोठा रोष पाहायला मिळत होता.

४ सप्टेंबरला होणार MPSC ची संयुक्त परीक्षा

येत्या ४ सप्टेंबर रोजी एमपीएससीची महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’साठीची संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’ संयुक्त पूर्वपरीक्षा २०२० ही परीक्षा खरंतर ११ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली होती. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एमपीएससीकडून ९ एप्रिल रोजी परिपत्रक काढून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर, आता ही परीक्षा ४ सप्टेंबर होणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. परिपत्रक काढून याबाबत विद्यार्थ्यांना सूचित देखील केलं गेलं आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या पर्वांगीमुळे या परीक्षेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.