विधवा सन्मान कायद्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार; महिलांचे आंदोलन

 शहरातील शालिमार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळय़ासमोर विधवा महिला सन्मान आणि संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

नाशिक : विधवांविषयी समाजात असणाऱ्या अनिष्ट रूढी, परंपरा थांबवायच्या असतील तर ‘विधवा महिला सन्मान व सरंक्षण कायदा’ शक्य तेवढय़ा लवकर अस्तित्वात यावा आणि हा कायदा जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत लढा शांततेच्या मार्गाने सुरूच ठेवण्याचा निर्धार येथे व्यक्त करण्यात आला.

 शहरातील शालिमार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळय़ासमोर विधवा महिला सन्मान आणि संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. जागतिक विधवा महिला दिनाच्या निमित्ताने विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियान नाशिक विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ास अभिवादन करण्यात आले. या अभिवादनानंतर जागतिक विधवा महिला दिनाचे महत्त्व, विधवांचे हक्क, अधिकार, विधवांसाठीच्या शासकीय योजना, याविषयी विधवा सन्मान व संरक्षण अभियानाचे राज्य निमंत्रक राजू शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले.

हे वाचले का?  तेल, डाळ, पिठाच्या दरवाढीने बहिणींना दिवाळी महाग, जितेंद्र आव्हाड यांची महायुतीवर टीका

संविधान पुस्तिकेतील प्रास्ताविकेचे वाचन मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी केले. विधवांना हळदी-कुंकू देत यापुढे या महिलांनी विधवा म्हणून न जगता सन्मानाने स्त्री म्हणून जगण्याचे आवाहन शोभा काळे यांनी केले. विधवांना समाजात दिली जाणारी वागणूक आणि येत असलेले अनुभव येथे उपस्थित असलेल्या अनेक महिलांनी मांडले. यात प्रामुख्याने यशोदा पर्वतकर, कुमोदिनी कुलकर्णी, पुष्पलता गांगुर्डे आदींचा समावेश आहे. यानंतर महिला प्रतिनिधींच्या उपस्थितीत आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना विधवा महिला सन्मान व सरंक्षण कायदा व्हावा म्हणून निवेदन देण्यात आले. या वेळी निर्मलाताई पगारे, दीपिका मारू, शिला झरेकर, हर्षांली शिंदे आदी उपस्थित होत्या.