विभागात नाशिक प्रथमस्थानी; इयत्ता दहावीच्या निकालात मुलींचे पुन्हा वर्चस्व

दहावीच्या परीक्षेत नाशिक विभागीय मंडळाचा निकाल ९५.९० टक्के लागला.

नाशिक : दहावीच्या परीक्षेत नाशिक विभागीय मंडळाचा निकाल ९५.९० टक्के लागला. विभागात उत्तीर्णतेत नाशिक जिल्हा आघाडीवर असून नंदुरबार पिछाडीवर आहे. उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुलींनी पुन्हा वर्चस्व राखले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकाल ३.७६ टक्क्यांनी घसरला. परंतु, या दोन्ही वर्षांच्या निकालात अंतर्गत मूल्यमापन आणि प्रत्यक्षात परीक्षा हा महत्त्वाचा फरक आहे. विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रत्यक्षात परीक्षा झाला नव्हत्या. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर झाला होता. यावेळी प्रत्यक्षात परीक्षा होऊन निकाल जाहीर झाला आहे. मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी आभासी पद्धतीने जाहीर करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक संगणक आणि भ्रमणध्वनीकडे डोळे लावून बसले होते. या परीक्षेला एकूण एक लाख ९६ हजार ७१४ विद्यार्थी बसले होते. त्यातील एक लाख ८८ हजार ६६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याबाबतची माहिती मंडळाचे विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांनी दिली.
निकालाचा जिल्हानिहाय विचार केल्यास नाशिक (९६.३७), धुळे (९५.४३), जळगाव (९५.७२), नंदुरबार (९४.९७) अशी टक्केवारी आहे. विभागात बसलेल्या एकूण मुलांपैकी एक लाख दोन हजार २९ विद्यार्थी अर्थात ९५.०८ टक्के उत्तीर्ण झाले.

हे वाचले का?  देवळालीत तोफगोळ्याचा स्फोट, लष्कराकडून चौकशीचे आदेश

मुलींचे उत्तीर्णतेचे हेच प्रमाण ८६ हजार २३७ असून टक्केवारी ९६.९० इतकी आहे. विशेष प्रावीण्य आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. विशेष प्रावीण्यप्राप्त ९१ हजार ७२९, प्रथम श्रेणीत ६८ हजार ५२०, द्वितीय श्रेणी २४ हजार ८९४, तर पास श्रेणीत ३५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी सोमवारपासून अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह २० ते २९ जून या कालावधीत विहित शुल्क भरून विभागीय मंडळाकडे आभासी अथवा शाळांमार्फत अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम छायाप्रत घेणे अनिवार्य असून ही छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. जुलै-ऑगष्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज भरून घेण्यात येणार आहे. दरम्यान, मूळ गुणपत्रिका कधी मिळणार याबद्दल यावेळीही संभ्रम कायम आहे. आभासी निकाल जाहीर झाल्यानंतर साधारणत: आठवडाभरात मूळ गुणपत्रिका शाळांमार्फत विद्यार्थ्यांना वितरित केल्या जातात. आभासी निकाल जाहीर करताना याबद्दल स्पष्टता केली नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्येसंभ्रम आहे.

हे वाचले का?  नाशिक : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन

कॉपीप्रकरणी ६४ विद्यार्थ्यांना शिक्षा
दहावीच्या निकालात विभागात ६९ गैरमार्ग प्रकरणे निदर्शनास आली. त्यापैकी ६४ विद्यार्थ्यांवर मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. तर पाच प्रकरणे निर्दोष होती. गैरमार्ग प्रकरणात नाशिक जिल्ह्यमत ३०, जळगाव १५, नंदुरबारच्या सहा तर धुळे जिल्ह्यमतील १८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विषयवार टक्केवारी
मराठी प्रथम भाषा ९६.६५

मराठी द्वितीय / तृतीय भाषा ९९.४०

हे वाचले का?  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेसाठी स्थानिक वास्तूविशारदांचे सहाय्य

उर्दू प्रथम भाषा ९६.७८

हिंदूी प्रथम भाषा ९७.७२

हिंदूी द्वितीय / तृतीय भाषा ९६.५९

इंग्रजी प्रथम भाषा ९९.६३

इंग्रजी द्वितीय / तृतीय भाषा ९६.३२

गणित ९७.३९

विज्ञान ९७.४७

सामाजिकशास्त्रे ९७.४४