विश्लेषण: उत्तर-दक्षिण भारताला जोडणारा रेल्वेमार्ग मार्गी लागणार? कोणती अडचण दूर झाली?

प्रबोध देशपांडे

या मार्गाच्या ब्रॉडगेजच्या कामात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा मुख्य अडथळा होता. त्यामुळे गत सहा वर्षांपासून या मार्गाचे काम रखडले होते.

जयपूर ते काचीगुडा हा उत्तर-दक्षिण भारताला जोडणारा मार्ग अद्याप अपूर्ण आहे. अकोला, खंडव्यावरून हा सर्वात जवळचा मार्ग आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर १० राज्यांना त्याचा लाभ होईल. या मार्गाच्या ब्रॉडगेजच्या कामात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा मुख्य अडथळा होता. त्यामुळे गत सहा वर्षांपासून या मार्गाचे काम रखडले होते. त्यावर उपाय म्हणून बुलढाणा जिल्ह्यातून पर्यायी मार्गाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची अडचण दूर झाली असून पर्यायी मार्गाच्या निर्मिती कार्याला वेग आला आहे.

हे वाचले का?  Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, विशेष न्यायालयाचे आदेश; कारण काय?

जयपूर ते काचीगुडा रेल्वे मार्ग केव्हा अस्तित्वात आला?

उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा सर्वात जवळचा १४५० कि.मी.चा लांबीचा काचीगुडा-जयपूर हा रेल्वेमार्ग १९५६-५७ पासून अस्तित्वात होता. या मार्गावरून देशातील दोन प्रमुख भागांना जोडणारी मीनाक्षी एक्स्प्रेस धावत होती. मार्गावर प्रवासीसह मालवाहू गाड्यांची वाहतुकही सुरू होती. अत्यंत महत्त्वाच्या या मार्गाचे ब्रॉडगेज करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात काचीगुडा ते पूर्णा व जयपूर ते रतलाम या मार्गाचे ब्रॉडगेज करण्यात आले. २०१० मध्ये अकोला ते पूर्णा हा रेल्वे मार्गही ब्रॉडगेजमध्ये रुपांतरीत झाला. दरम्यान, २००८ मध्ये अकोला-खंडवा-रतलाम या मार्गाच्या ब्रॉडगेजलाही हिरवी झेंडी मिळाली.

हे वाचले का?  अन्यथा ‘लाडकी बहीण’ रद्द करू! सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा अडथळा काय होता?

काचीगुडा-जयपूर रेल्वे मार्गामधील प्रमुख टप्पा अकोट-आमला खुर्ददरम्यान ७८ कि.मी. मीटरगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील संरक्षित क्षेत्राचा मुख्य अडथळा आला. वाघांच्या अधिवासाला धोका निर्माण होण्याचे कारण पुढे करून वन्यजीव प्रेमींनी ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला विरोध केला. मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्राच्या संरक्षित क्षेत्रातून ३८.२० कि.मी.चा मार्ग जातो. त्यात अतिसंरक्षित क्षेत्र १७ कि.मी.च्या आसपास आहे. रेल्वेने ब्रॉडगेजचा प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर केला होता. या मार्गाला परवानगी मिळाली नाही. विरोधामुळे या प्रकरणी न्यायालयामध्ये देखील धाव घेण्यात आली. हा प्रश्न न्यायप्रविष्ठ झाला. त्यामुळे हा रेल्वे मार्ग रखडला होता.