वीजतारेच्या धक्क्याने दोन मित्रांचा मृत्यू

संतप्त नागरिकांनी दोन्ही युवकांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला होता.

नाशिक : विजेच्या तारेला चिटकून दोन जीवलग मित्रांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी सटाण्यातील न्यू प्लॉट भागात हा प्रकार घडला. महावितरणाच्या गलथान कारभारामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी दोन्ही युवकांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला होता. कार्यकारी अभियंता सुनील बोंडे यांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकानी युवकांवर अंत्यसंस्कार के ले. सटाणा बाजार समितीचे मापारी यशवंत सोनवणे यांचा एकुलता एक मुलगा ओमकार (२३) आणि ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते संजय ह्याळीज यांचा मुलगा भूषण (२४) हे दोघे मित्र शनिवारी रात्रीच्या सुमारास न्यू प्लॉट येथील आपल्या राहत्या घराजवळील शाळेच्या इमारतीत नेहमीप्रमाणे गप्पा मारत होते. रात्री उशिरा मुसळधार पाऊस  झाल्याने ते शाळेतच अडकले. पाऊस उघडल्यानंतर घरी येत असतांना तुटलेल्या विजेच्या तारेवर पाय पडल्याने भूषण तारेला चिटकला. हे पाहून त्याला सोडविण्यासाठी ओमकार गेला असता त्यालाही विजेचा धक्का बसला. रविवारी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास रहिवासी बाहेर पडले असता दोघे युवक मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून वीज पुरवठा खंडित करण्यात आला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले. दरम्यान, संतप्त नागरिकांनी जीर्ण झालेल्या वीज तारांमुळेच निष्पाप मुलांचा बळी गेल्याचा आरोप करत कुटुंबियांना आर्थिक भरपाई मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. सटाणा ग्रामीण रुग्णालयात जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. आमदार दिलीप बोरसे यांनी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी कार्यकारी अभियंता सुनील बोंडे यांच्याशी संपर्क साधून संबंधित युवकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत सूचना केल्या. कार्यकारी अभियंत्यांनी तातडीची मदत म्हणून प्रत्येकी २० हजार रुपये देण्यात आले. मृतांच्या कुटुंबियांना भरपाई द्यावी म्हणून नागरिकांनी सहा तास ग्रामीण रुग्णालयात ठिय्या दिला. कंपनीमार्फत जास्तीची मदत कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वसन दिल्यानंतर रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोघा युवकांचे मृतदेह ताब्यात घेऊन शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे वाचले का?  लक्षवेधी लढत: जातीय ध्रुवीकरणामुळे भुजबळांसमोर कडवे आव्हान