वीजनिर्मिती कंपन्यांची कोटय़वधी रुपयांची येणी सरकारी वीजवितरण कंपन्यांकडे थकल्याने कोळशाचे पैसे कसे द्यायचे याचा प्रश्न निर्माण होत आहे.
मुंबई : वीजनिर्मिती कंपन्यांची कोटय़वधी रुपयांची येणी सरकारी वीजवितरण कंपन्यांकडे थकल्याने कोळशाचे पैसे कसे द्यायचे याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातून वीजनिर्मितीसाठी इंधनाचा प्रश्न निर्माण होऊन वीजसंकट उभे राहू शकते. त्यामुळे वीजनिर्मिती कंपन्यांचे, कोल इंडियाचे कोळशाचे पैसे वेळेवर द्यावेत. थकबाकी तातडीने द्यावी, असे पत्र केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने महाराष्ट्रासह थकबाकीदार राज्यांना पाठवले आहे.
महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांकडे हजारो कोटी रुपयांची देणी थकली आहेत. त्यामुळे राज्याच्या वीजवितरण कंपन्यांना वीज पुरवणाऱ्या वीजनिर्मिती कंपन्या, कोळशाचा पुरवठा करणारी कोल इंडिया यांचे पैसे थकले आहेत. देशाचा विचार करता विविध राज्यांकडे एकूण १ लाख ५ हजार कोटी रुपये थकले आहेत. थकबाकीची रक्कम एक लाख कोटी रुपयांवर गेल्याने केंद्रीय ऊर्जा विभाग खडबडून जागा झाला आहे. महाराष्ट्राचा विचार करता थकबाकीची एकूण रक्कम २२ हजार ४०० कोटी रुपयांवर पोहोचली असून कोल इंडियाचेही २५०० कोटी रुपयांची थकबाकी महाराष्ट्राकडे आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने महाराष्ट्रासह विविध राज्यांना पैसे वेळेवर देण्यास सांगत वीजसंकट तयार होईल, असा इशारा पत्राद्वारे दिला आहे.