हरित नाशिक-सुंदर नाशिक या संकल्पनेला छेद देण्यासाठी महापालिकेकडून पाऊल उचलण्यात आले असल्याचा आरोप करून रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली त्रिमूर्ती चौक ते माउली लॉन्स परिसरातील मुख्य रस्त्यावरील झाडे तोडण्याचा प्रयत्न मानव उत्थान मंचच्या वतीने हाणून पाडण्यात आला.
नाशिक: हरित नाशिक-सुंदर नाशिक या संकल्पनेला छेद देण्यासाठी महापालिकेकडून पाऊल उचलण्यात आले असल्याचा आरोप करून रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली त्रिमूर्ती चौक ते माउली लॉन्स परिसरातील मुख्य रस्त्यावरील झाडे तोडण्याचा प्रयत्न मानव उत्थान मंचच्या वतीने हाणून पाडण्यात आला. मंच आणि पर्यावरणप्रेमी सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. काम थांबेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असा इशारा यावेळी पर्यावरणप्रेमींनी दिला.
येथील त्रिमूर्ती चौक ते माउली लॉन्स दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर वड, पिंपळ, उंबर अशी १८३ झाडे आहेत. ही झाडे ५० वर्षांहून जुनी आहेत. महापालिकेच्या वतीने या भागातील १२० फूट असलेला रस्ता २०० फुटापर्यंत रुंदीकरण करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी काही मोठी झाडे तोडण्यात आली. याबाबत एस्पायर शाळेचे विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिकांनी मानव उत्थान मंच तसेच अन्य पर्यावरणप्रेमी संघटनांना याबाबत माहिती दिली. मंगळवारी सकाळी वृक्षतोडीच्या कामाला सुरुवात होताच मंचच्या पदाधिकाऱ्यांनी साईखेडकर रुग्णालयाजवळील झाडांजवळ धाव घेतली. परिसरातील नागरिकांनीही मंचच्या कार्यकत्र्यांना पाठिंबा दर्शविला. हे काम थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. याविषयी मंचचे जगबीर सिंग यांनी माहिती दिली. परिसरातील नागरिकांनी तसेच शाळेच्या पालकांनी कळविल्याने धाव घेतली.
वास्तविक वड, पिंपळ, उंबर ही झाडे तोडू नये, असा न्यायालयाचा निर्णय असतानाही महापालिका कोणालाही जुमानत नाही. तीन दिवसांपूर्वी न्यायालयात याचिका दाखल केली असून लवकरच या कामास स्थगिती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेत हा विषय मांडणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. बुधवारीही महापालिकेला काम करू दिले जाणार नाही. या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी मुख्यमंत्र्यांना आमची झाडे वाचवा या आशयाचे पत्र पाठवणार आहेत. याशिवाय अन्य मार्गाने विरोध दर्शविण्यात येईल, असे सिंग यांनी नमूद केले.