पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबरील द्विपक्षीय चर्चेची फलनिष्पत्ती म्हणून भारत-अमेरिका व्यापार-तंत्रज्ञान सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले आहे.
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबरील द्विपक्षीय चर्चेची फलनिष्पत्ती म्हणून भारत-अमेरिका व्यापार-तंत्रज्ञान सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले आहे. भारतीय वायुदलासाठी जेट इंजिनांची सहनिर्मिती, संरक्षण उद्योगात भागीदारी, अंतराळ क्षेत्रात सहकार्य, सेमिकंडक्टर पुरवठा साखळी आणि संशोधनात भागीदारी, नव्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भागीदारी आदींबाबतचे करार यावेळी करण्यात आले.
मोदी यांचा हा दौरा होत असतानाच जीई एअरस्पेसने गुरुवारी त्यांच्या हिंदूस्थान एअरोनॉटिक्सबरोबरच्या सामंजस्य कराराची घोषणा केली. त्यानुसार, भारतीय हवाई दलासाठी लढाऊ जेट इंजिन तयार केले जाणार आहेत. या अत्याधुनिक इंजिनांमुळे भारतीय हवाई दलाचे बळ वाढणार आहे. मोदी आणि बायडेन यांनी द्विपक्षीय चर्चेत संरक्षण क्षेत्रातील भागीदारी वाढविण्याचा निर्धार केला. त्यांनी यासाठीच्या आराखडय़ाचे स्वागत केले आहे. यातून अत्याधुनिक संरक्षण साहित्याची सहनिर्मिती, चाचण्या, संयुक्त संशोधनाला चालना मिळणार आहे. या क्षेत्रातील नियामक अडथळे दूर करण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचे त्यांनी प्रसृत केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. तांत्रिक सहकार्य, संशोधनात सहकार्य वाढविण्याचे सुतोवाच त्यांनी केले.