शरद पवारांवर टीका करणाऱ्या शिवसेना आमदाराला शशिकांत शिंदेंनी सुनावलं; “दोन वर्षांच्या सत्तेने डोक्यात हवा आणि गर्व…”

“आपली उंची पाहून शरद पवारांवर टीका करा,” राष्ट्रवादीच्या आमदाराने शिवसेना नेत्याला सुनावलं, म्हणाले “हवं तर तुमच्या वडिलांना..”

महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मांडीला मांडी लावून बसले असले तरी राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळ्यांवर दोन्ही पक्षाच्या नेते आमने-सामने आल्याचं दिसत आहे. साताऱ्यातही शिवसेना आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध रंगलं आहे. रयत शिक्षण संस्था यामागंच मुख्य कारण ठरलं आहे. महेश शिंदे शरद पवारांवर टीका करत असल्याने शशिकांत शिंदे यांनी संताप व्यक्त केला असून तुमचे राजकारण संपेल असा इशारा दिला आहे.

“इतक्या मोठ्या परिवाराचं नेतृत्व सर्व क्षेत्रातील ज्ञान असणारा हा नेता सर्वांच्या सहमतीने करत असेल तर ज्यांच्या डोक्यात दोन वर्षांच्या सत्तेने हवा गेलीये आणि गर्व झाला आहे त्यांनी अशाप्रकारे टीका करणं निंदनीय आहे. त्यांनी त्यांची उंची किती आणि शरद पवारांची उंची किती हे तपासून मग टीका करावी,” असंही ते म्हणाले.

हे वाचले का?  मोदी यांच्या सभेस चार उमेदवार अनुपस्थित; देवळालीतील सरोज अहिरे व्यासपीठावर, शिंदे गटाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

“शरद पवारांचं रयत शिक्षण संस्थेसाठी योगदान किती आहे याचा आधी त्यांनी अभ्यास करावा. त्यांचे वडीलही रयत शिक्षण संस्थेशी संबंधित होते. किंवा अन्य कोणाकडून तरी माहिती घेऊन मग टीका करावी,” असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. “कर्मवीर भाऊराव पाटलांचा वटवृक्ष जपण्याचं काम शरद पवार करत आहेत आणि त्यांच्यावर अशी सातारा जिल्ह्यापुरती त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही आणि त्यांना शोभणारंही नाही,” असं यावेळी त्यांना सुनावलं.

भ्रष्टाचार झाला असेल तर दाखवून द्यावं, पण राजकारणासाठी नाहक बदनामी करु नये. जर शंका असेल आपल्या वडिलांना विचारा किंवा तुमच्यासोबत जिल्हा बँकेत पाठवलेले कोरेगावचे ते पदाधिकारी रयत शिक्षण संस्थेवर आहेत त्यांच्याकडून माहिती घ्यावी,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव

“ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून मोठा व्हावा, या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली होती. सध्याच्या आधुनिक व स्पर्धेच्या युगात ही संस्था टिकवण्याचे काम संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी केलं. शैक्षणिक स्पर्धेत दर्जा आणि सुविधा देण्याचं काम सरकारचे आहे. पण अनुदान असे कितीसे मिळते. त्यापेक्षा १२ ते १५ कोटी रुपयांचा निधी केवळ शरद पवार यांच्या आव्हानावरून मिळतो. संगणकापासून ते इंजिनिअरिंगपर्यंत अनेक प्रकल्प शरद पवारच अध्यक्ष झाल्यापासून या संस्थेत सुरु केले आहेत. शासकीय अनुदान व्यतिरिक्त निधी उभा करण्याची किमया या महाराष्ट्रात त्यांच्याच माध्यमातून झाली आहे. अनेक लोक इतर संस्थेचे अध्यक्ष आहेत, परंतु त्यांचे योगदान आणि शरद पवार यांचे रयतमधील योगदान पाहता त्यांच्याबद्दल बोलताना आपली उंची किती याची तपासणी करावी. आपण किती बोलतो याचे भान ठेवावे,” असाही सल्ला शशिकांत शिंदे यांनी दिला.