शाळांची मनमानी सुरूच

शुल्क भरण्याचा तगादा; पालकांचा संघर्ष तीव्र

शुल्क भरण्याचा तगादा; पालकांचा संघर्ष तीव्र

वसई: शाळांचे शुल्क भरण्यावरून पालक आणि शाळांमध्ये संघर्ष वाढू लागला आहे. वाढीव शुल्क आकारू नये तसेच शुल्क कमी करावे यासाठी पालक शाळांविरोधात आंदोलन करत आहेत. काही शाळांनी शुल्कासाठी विद्यार्थ्यांचे निकाल रोखून धरले आहेत.

करोनामुळे टाळेबंदी लागू झाली आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. शाळा प्रत्यक्ष सुरू न होता ऑनलाइन सुरू झाल्या. मात्र या काळात पालकांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने शाळांची पूर्ण शुल्क आकारू नये अशी पालकांची मागणी होती. मात्र वसई-विरारमधील अनेक शाळांनी शुल्क भरण्यासाठी पालकांकडे आणि विद्यार्थ्यांंकडे तगादा लावला आहे. त्यातच काही शाळांनी शुल्कात देखील वाढ केली आहे.

यामुळे वसई-विरारमधील विविध शाळांमध्ये पालकांनी आंदोलन सुरू केले आहे. सध्या पूर्ण प्रमाणत शाळा सुरू झालेल्या नाहीत. आठवडय़ातील काहीच दिवस शाळा भारत आहेत त्यातही शाळेतील सर्व इतर उपक्रम बंद आहेत. तर काही ठिकाणी संपूर्ण  शिक्षण हे ऑनलाइन सुरू आहे. टाळेबंदीमुळे आधीच पालकांवर आर्थिक भार पडला आहे. शाळा सुरू झाल्याचे निमित्त करून शाळाचालकांनी पालकांना फी भरण्याची सक्ती केली आहे. ही फी आम्ही कशी भरणार असे विरारमधील पालक प्रवीण परमार यांनी सांगितले. ऑनलाइन शाळा सुरू असताना शिक्षकांकरवी शालेय शुल्क भरण्याचा तगादा शाळा लावत असल्याचा आरोप पालकांनी केला. विरारमधील एका प्रख्यात शाळेने तर शालेय शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांंचे निकाल रोखून धरले आहेत.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

शाळा बंद असतानाही शाळांनी पालकांच्या मागे शिकवणी शुल्काचा तगादा लावला आहे. त्यातही अनेक शाळांनी १५ ते २० टक्के शुल्कवाढ केली आहे. त्यात संगणक , कला-क्रीडा उपक्रम, प्रयोगशाळा , शाळा दुरुस्ती आणि अवांतर असे काही शुल्क शाळांनी लावले आहे. यामुळे शाळा पालकांना नवा आर्थिक फास लावत असल्याचा आरोप किरण सोलंकी या पालकाने केला आहे.

माजी महापौर रुपेश जाधव यांनी शाळांनी शुल्कवाढ करू नये, तसेच शुल्क कमी करावे यासाठी विविध शाळांना निवदने दिली आहेत नालासोपारामधील कपोल शाळेने ५० टक्के शुल्क कपात केली आहे. जेबी लुधानी, राहुल इंटरनॅशन, मदर मेरी स्कूल, मदर तेरेजा, आदी शाळांनी २० टक्के शुल्क कपात केली आहे. तर अन्य काही शाळांनी ३० टक्के कपात केली आहे. मात्र सेठ विद्यामंदिर तसेच सेंट अ‍ॅलॉयशेस या दोन शाळांनी न्यायालयात धाव घेतली आहे, अशी माहिती रुपेश जाधव यांनी दिली. शाळांनी कपात केली नाही तर शाळांच्या बाहेर उग्र आंदोलन केले जाईल, असेही जाधव यांनी सांगितले.

हे वाचले का?  नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा

शाळांना शुल्क संदर्भात कुठलीही  सक्ती करता येणार नाही आहे. उलट शाळांनी सुलभ  हप्त्यात शुल्क भरण्यासाठी सवलत उपलब्ध करून दिली पाहिजे,  सध्या पालकांच्या तक्रारी वाढत आहेत. यासाठी आम्ही शिक्षण विभागाकडे माहिती पाठविली आहे, असे वसईच्या गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल यांनी सांगितले.

सक्ती केल्यास कारवाईमहापालिकेचा इशारा

भाईंदर : टाळेबंदीमुळे सामान्य पालकांना आपल्या पाल्यांचे शालेय शुल्क भरणे कठीण झाले आहे.मात्र तरी देखील काही  खाजगी शाळेकडून शुल्क भरण्याकरिता विध्यार्थावर  दबाव टाकला जात असल्याची तक्रार पालकांकडून सातत्याने पालिका प्रशासनाला करण्यात येत आहे.त्यानुसार आता खासगी शाळांनी शुल्क सक्तीच्या नावावर मुलांवर दबाव टाकल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालिका प्रशासनाने परिपत्रकाद्वारे दिला आहे.

मिरा—भाईंदर शहरातील शाळा अद्याप सुरू करण्यात आल्या नसल्या तरी ऑनलाइन पद्धतीने वर्ग सुरू करण्यात आले आहे.त्यामुळे अनेक खासगी  शाळांकडून पालकांकडे शुल्क वसूलीसाठी वारंवार तगादा लावला जात आहे.सध्य परिस्थितीत  शाळांकडून ऑनलाइन पद्धतीने प्रथम  सत्र परीक्षा नुकत्याच  घेण्यात आल्या आहेत.त्याचे निकाल देखील ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आले आहेत.मात्र अनेक शाळांनी  शाळा सुरू झाल्यापासूनचे शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना निकाल दाखवण्यास नकार दिला आहे.तसेच पालकांनी संपूर्ण वर्षांचे शुल्क न भरल्यास द्वितीय सत्राचे परीक्षेला देखील बसू दिले जाणार नाही असे सांगत सक्तीची वसुली केली जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

हे वाचले का?  अहमदनगरची अक्षता जाधव अबॅकस परीक्षेमध्ये राज्यात दुसरी

त्यावर पालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील सर्व खाजगी शाळांना एकत्र शुल्क  भरण्याची सक्ती न करता पर्याय उपलब्ध करून द्यावा, २०—२१ या शैक्षणिक वर्षांत शुल्क  वाढ  करू नये, ऑनलाइन शिक्षणामुळे ज्या सुविधांचा वापर विद्यार्थी करत नसतील  त्यांची शुल्क कमी करावी अशा  सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच  विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवत त्याचे मानसिक खच्चीकरण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी  दिला आहे . त्यामुळे पालकांनी दिलासा व्यक्त करत महापालिकेने निर्णयलवकर घ्यायला हवा होता असे मत व्यक्त केले