विद्यार्थ्यांनी शाळेच्या गणवेशाचे पालन केले पाहिजे. जे विद्यार्थी या गणवेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे दिलावर म्हणाले.
भारतातील वेगवेगळ्या शाळांतील गणवेश आणि त्यासाठीचे नियम हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. काही विद्यार्थी तसेच पालकांकडून गणवेशांबाबतच्या नियमांना विरोधही केला जातो. दरम्यान, राजस्थानमधील भाजपा सरकारने शाळेतील गणवेशाबाबत कठोर पवित्रा घेतला आहे. राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.
हनुमानासारखा वेश परिधान करून आल्यास कसं होणार?
विद्यार्थ्यांनी शाळेच्या गणवेशाचे पालन केले पाहिजे. जे विद्यार्थी गणवेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे दिलावर म्हणाले. “शाळेच्या गणवेशाव्यतिरिक्त अन्य कोणतेही कपडे परिधान करणे ही बेशीस्त आहे. एखादा विद्यार्थी हनुमानाचा वेश परिधान करून शाळेत आल्यावर कसं होईल. त्यामुळे शाळेतील सर्वांनीच गवेशाच्या नियमांचे पालन करायला हवे, असे आमचे आवाहन आहे. जे गणवेशाच्या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल,” असे दिलावर म्हणाले.
कायद्यानुसार कारवाई केली जाईल- दिलावर
शाळेच्या गणवेशाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कपड्यांत शाळेत जाणे योग्य नाही. कोणत्याही परिस्थितीत गणवेश घालून गेले पाहिजे. तसे न झाल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे दिलावर यांनी सांगितले.
विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्यामुळे वाद
दरम्यान, गेल्या आठवड्यात राजस्थानमधील एका शाळेत विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्यामुळे वाद झाला होता. त्यानंतर मदन दिलावर यांनी अशा प्रकारे गणवेशाच्या निमयांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. तर राजस्थानचे गृहराज्यमंत्री जवाहरसिंह बेधाम यांनीदेखील विद्यार्थ्यांनी गणवेशाव्यतिरिक्त अन्य कोणतेही कपडे परिधान करून शाळेत येऊ नये, अशी भूमिका घेतली होती.