शाळा स्तरावर सेल्फी पॉइंट, प्रवेशोत्सव सोहळा, पहिले पाऊल असे विविध उपक्रम

बुधवारी जिल्हा परिसरातील चार हजारांहून अधिक खासगी, महापालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला येणार आहे.

नाशिक : सोमवारी शहरासह जिल्ह्यातील पूर्वप्राथमिकच्या काही शाळा सुरू झाल्या असताना बुधवारपासून जिल्ह्यातील सर्वच शाळा सुरू होणार असल्याने नवीन शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आनंदमय जाण्यासाठी शाळांमध्ये शिक्षकांकडून तयारी करण्यात येत आहे. शाळा स्तरावर सेल्फी पॉइंट, प्रवेशोत्सव सोहळा, पहिले पाऊल असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सर्व शिक्षा अभियानअंतर्गत एकही विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व शाळांमध्ये पुस्तके दिली असून ती पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पडतील, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

बुधवारी जिल्हा परिसरातील चार हजारांहून अधिक खासगी, महापालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला येणार आहे. दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर पहिल्यांदाच विद्यार्थी वर्गात येणार असल्याने शाळेच्या दर्शनी भागात सुस्वागतमचे फलक झळकणार आहेत. नव्याने शाळेत येणाऱ्या बालकांसाठी शाळेचे वेगळे नियोजन सुरू आहे. सर्व शिक्षा अभियानअंतर्गत चार हजार २३५ शाळांमध्ये २७ लाख ५५ हजार ८४२ पाठय़पुस्तकांचे वितरण करण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी सांगितले. नाशिक महापालिका हद्दीत २९० शाळांमध्ये पाच लाख २२ हजार ४४४ पुस्तक संच वितरित झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवी पुस्तके हाताळण्यास मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हे वाचले का?   ‘नीट-यूजी’ परीक्षेत व्यवस्थेला खिंडार नाही ; सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

मागील वर्षी करोना संसर्ग नियंत्रणात येत असताना शाळा सुरू झाल्या. मात्र ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना प्रवासाची सोय नसल्याने त्यांना शाळेपर्यंत येता आले नाही. या पाश्र्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी तालुकानिहाय बसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शाळांकडून मागणी झाल्यास बस सोडण्यात येतील, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली. शाळेच्या पहिल्या दिवसाची नवलाई विद्यार्थ्यांना अनुभवता यावी यासाठी पालकही सज्ज झाले आहेत. शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला नवे शैक्षणिक साहित्य, रेनकोट, छत्री, डबे, पाण्याची बाटली, शालेय गणवेश यांसह अन्य खरेदी करण्यासाठी शहर परिसरातील मुख्य बाजारपेठेसह अन्य दुकानांत पालकांनी गर्दी केली होती.

हे वाचले का?  Rohit Pawar : “आचारसंहिता लागण्याआधी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात काढा, अन्यथा…”, रोहित पवारांचा इशारा

एक हजार २३४ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित
नाशिक जिल्ह्यातील ४२२ शाळांमध्ये चार हजार ५१३ विद्यार्थ्यांचे प्रवेश आरक्षित असताना सर्वाना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आतापर्यंत प्रतीक्षा यादीतील तीन हजार २७९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. अद्याप एक हजार २३४ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आनंदापासून वंचित राहावे लागेल.

हे वाचले का?  IAS Puja Khedkar used OBC quota : कोट्यवधींची संपत्ती असलेल्या पूजा खेडकर यांनी MBBS चा प्रवेशही ओबीसी कोट्यातून घेतला