शिवसेना-राष्ट्रवादीचा परस्परांना शह देण्याचा प्रयत्न

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

धूर फवारणीला शिधापत्रिका शिबिराने उत्तर

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीची घटिका जशी समीप येत आहे, तसतसे राजकीय पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू झाली आहे. प्रभागात धूर फवारणी केली जात नसल्याचा आरोप करत शिवसेनेने शहरात सर्वत्र धूर फवारणीची घोषणा केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शिधापत्रिका शिबीर राबविण्याचे जाहीर केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर मात्र आघाडीबाबत अनिश्चितता आहे. निवडणुकीच्या तयारीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस परस्परांना शह देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. राज्यात आकारास आलेली महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर राहील की नाही, याबद्दल अंतिम क्षणी निर्णय होईल. मध्यंतरी खा. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पुढील महापौर शिवसेनेचाच असेल असे म्हटले होते. सेनेच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस देखील सावध झाले आहेत. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी सर्व जागा लढण्याच्या दृष्टिकोनातून तयारीला सुरुवात केली आहे. काँग्रेसला तर मित्रपक्ष राष्ट्रवादीची धास्ती आहे.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारनं थांबवला, नवे अर्जही स्वीकारणं बंद; नेमकं कारण काय?

गेल्या वेळी आघाडी असूनही राष्ट्रवादीने काँग्रेसच्या जागांवर पक्षाचे अधिकृत उमेदवार उभे केले होते. तो अनुभव लक्षात घेऊन काँग्रेस ताक देखील फुंकून पिण्याच्या मानसिकतेत आहे. राष्ट्रवादी सर्व जागा लढण्याच्या दृष्टीने तयारीला लागली आहे.

त्या अनुषंगाने मध्यंतरी पदाधिकाऱ्यांनी प्रभागनिहाय बैठका घेऊन आढावा घेतला. दरम्यानच्या काळात शिवसेनेने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभागनिहाय धूर फवारणीचा कार्यक्रम जाहीर केला. धूर फवारणी यंत्रांची खरेदी करत शिवसैनिकांमार्फत हे काम करण्याचे नियोजन आहे. याद्वारे मतदारांपर्यंत पोहोचून सत्ताधारी भाजपचे अपयश दाखवण्याचा सेनेचा प्रयत्न आहे.

हे वाचले का?  Prakash Ambedkar : राहुल गांधींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली, अपशब्द वापरत म्हणाले, “ते आपल्याला..”

राष्ट्रवादीने एक ते २८ फेब्रुवारी या कालावधीत शिधापत्रिका शिबीर राबविण्याचे जाहीर केले. प्रजासत्ताक दिनी माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्याची घोषणा केली. शिधापत्रिकेसाठी नागरिकांना कार्यालयात चकरा माराव्या लागतात. कागदपत्रांची अपूर्णता, अपुरी माहिती यामुळे अनेक कुटुंबाच्या शिधापत्रिकेत दुरुस्ती होत नाही. मात्र, आता पक्षातील विविध आघाड्यांचे पदाधिकारी शहरातील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांना त्यांच्या शिधापत्रिकेबाबतच्या अडचणी जाणून त्या शिबिरामार्फत सोडविणार आहे. या शिबिरात फाटलेली शिधापत्रिका नवीन करणे, पत्ता बदल, हरवलेली शिधापत्रिका नवीन करणे, शिधापत्रिकेचे विभक्तीकरण, नाव वाढविणे-कमी करणे आदी कामे केली जातील. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी घरी जाऊन सर्व कागदपत्रे घेणार असल्याने नागरिकांचे वेळ आणि पैसे वाचणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. या विशेष अभियानानंतर शहरात अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अन्न नागरी पुरवठा विभागाचे मंत्रिपद खुद्द छगन भुजबळ यांच्याकडे

हे वाचले का?  Amit Thackeray on Uddhav Thackeray : “… अन् दोन भाऊ एकत्र येण्याचा विचार माझ्यासाठी संपला”, अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

आहे. या विभागाशी निगडित शिधापत्रिकाधारकांचे प्रश्न शिबिरातून सोडविण्याचे नियोजन राष्ट्रवादीने केले आहे. या उपक्रमातून मतदारांशी संपर्क वाढविण्यास मदत होईल. शिवाय सेनेच्या धूर फवारणी मोहिमेला शह दिला जाईल, असे चित्र आहे.