शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; मोठ्या नेत्याची जाहीर ऑफर

साताऱ्यात सध्या नगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे

साताऱ्यात सध्या नगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पॅनेल उभं करण्यात आलं असून दीपक पवार या निवडणुकीचं नेतृत्व करतील असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे. यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत. मात्र यावेळी त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना जाहीर ऑफर दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीत आल्यास नगरपालिका निवडणुकीचं नेतृत्व शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे देऊ असं जाहीर केलं आहे. नेतृत्व कोण करणार या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना शशिकांत शिंदे यांनी, “शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत आले तर ते करतील. नाही आले तर मी आणि दीपक पवार करु”, असं उत्तर दिलं. शशिकांत शिंदेंच्या या ऑफरवर शिवेंद्रराजे भोसले या काय उत्तर देतात हे मात्र आता पहावं लागणार आहे.

हे वाचले का?  Sanjay Shirsat: भरत गोगावलेंचं मंत्रीपद संजय शिरसाटांमुळे हुकलं? ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण; शिंदे गटातली धुसफूस चव्हाट्यावर!

शिवेंद्रराजेंची धमकी
शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना जाहीर धमकी दिलेली आहे. “माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्यांचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही,” अशा शब्दांत शिवेंद्रराजे भोसले यांनी आव्हान दिलं आहे. साताऱ्यातील जावळी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवेंद्रराजेंनी नेमकं काय म्हटलं होतं–
“माझी वाट लागली तरी चालेल, माझं सर्व संपलं तरी चालेल पण मी त्यांचं सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही. माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार ही आपली भूमिका आहे. आपला काटा जर कोणी काढत असेल तर मग काट्याने काटा काढायचा हीच आपली भूमिका स्पष्ट आहे. याबाबतीत मी पण मागे फिरणाऱ्यातील नाही. जर कोणी आडवेपणा करत असेल तर मी पण स्वभावाने आडवा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढवून निवडून आलेला माणूस आहे.”

हे वाचले का?  Mahayuti : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ, महायुतीपुढची नेमकी आव्हानं काय?

शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी शशिकांत शिंदे प्रयत्न करत असून त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच शिवेंद्रराजे यांनी दिलेलं हे आव्हान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.