संत निवृत्तीनाथ पालखीचे शहरात आगमन, वाहतूक मार्गात बदल

पालखी शनिवारी नाशिक शहरात प्रवेश करणार असून त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरसाठी निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचा शुक्रवारी सातपूर येथे मुक्काम झाला. पालखी शनिवारी नाशिक शहरात प्रवेश करणार असून त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

हे वाचले का?  जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

विठुनामाच्या जयघोषात त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने गुरूवारी मार्गस्थ झाली. पालखी शुक्रवारी नाशिकजवळील सातपूर हद्दीत मुक्काम करून शनिवारी सकाळी नाशिककडे सरकेल. त्र्यंबक रोडवरील पंचायत समिती कार्यालयाजवळ सकाळी महापालिकेच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर पालखी शहरात येईल. पालखीमुळे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

त्यानुसार शनिवारी सकाळी साडेसात ते रविवारी रात्री नऊ या वेळेत पालखी जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पंचायत समिती ते मोडक सिग्नलकडे जाणारा रस्ता, मोडक सिग्नल ते अशोकस्तंभ,अशोकस्तंभ ते रविवार कारंजा- धुमाळ पॉइंट- गाडगे महाराज पुतळा -बादशाही कॉर्नर- महात्मा फुले मार्केट- काजीपुरा पोलीस चौकी हे रस्ते सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.

हे वाचले का?  जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

काजीपुरा पोलीस चौकी ते शिवाजी चौक, अमरधाम ते गणेशवाडी पंचवटी रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद राहील. द्वारकाकडून नाशिकरोडकडे जाणारी मार्गिका बंद राहणार आहे. दत्तमंदिर सिग्नलपासून बिटको चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नाशिकरोड यादरम्यानचा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.