संमेलनाध्यक्षपदी डॉ. नारळीकर

९४ वे मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चदरम्यान नाशिकमध्ये 

नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ आणि प्रख्यात विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची रविवारी बहुमताने निवड करण्यात आली आहे.

साहित्य संमेलन २६ ते २८ मार्च या कालावधीत नाशिक येथील गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन राजकीय व्यक्तीऐवजी साहित्यिकाच्या हस्ते करण्यात येईल.

संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रथमच खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखकाची निवड करण्यात आली. घटक संस्था, निमंत्रक संस्थांनी अध्यक्षपदासाठी डॉ. नारळीकर, कथाकार भारत सासणे, विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, विज्ञान कथालेखक बाळ फोंडके, कीर्तन परंपरेचे अभ्यासक रामचंद्र देखणे, साहित्यिक मनोहर शहाणे अशी सहा नावे सुचवली होती; परंतु कोणत्याही एका नावावर एकमत झाले नाही. अखेरीस मतदान होऊन डॉ. नारळीकर यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली.

डॉ. नारळीकर संमेलनात प्रत्यक्ष की दूरचित्रसंवाद माध्यमाद्वारे सहभागी होतील, याबाबत मध्यंतरी शंका उपस्थित करण्यात आली होती; परंतु महाराष्ट्र साहित्य परिषदेने डॉ. नारळीकर संमेलनात तीनही दिवस प्रत्यक्ष उपस्थित राहतील, असे संमतिपत्र दिले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. अध्यक्षांनी संमेलनात उपस्थित राहणे वाचक, लेखक सर्वाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी नमूद केले. संमेलनाची तारीख निश्चित झाली असली तरी सविस्तर कार्यक्रम नंतर जाहीर केला जाणार आहे. यात काही जुन्या, काही नव्या पद्धतीचे मिश्रण करून प्रयोग आणि परंपरा यांची सांगड घातली जाईल, असे ठाले-पाटील यांनी सांगितले.

हे वाचले का?  Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, सिनेसृष्टीतील योगदानाबाबत गौरव

संमेलनात सहा परिसंवाद होतील. तीन ते साडेतीन तासांचे निमंत्रितांचे कवी संमेलन असेल. दोन नव्या उपक्रमांचा समावेशही करण्यात आला आहे. इंग्रजांच्या राजवटीतील आधुनिक गद्य परंपरा आणि नाशिक जिल्ह्य़ाच्या स्थापनेस १५१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष कार्यक्रम होतील. साहित्यातील योगदानाबद्दल कादंबरीकार मनोहर शहाणे यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. संमेलन सर्वासाठी खुले असून साहित्यप्रेमींना बंधन घालता येणार नसल्याचे ठाले-पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापासून राजकीय नेत्यांना दूर ठेवण्याचे सूतोवाच ठाले-पाटील यांनी केले असले तरी यात बदल होऊ शकतो, हेही त्यांनी नमूद केले. मागील २० वर्षांत संमेलनात मुख्यमंत्री वा अन्य राजकीय मंडळींना अनेकदा स्थान देण्यात आले; परंतु आगामी साहित्य संमेलनाचे उद्घाटन लेखकाच्याच हस्ते केले जाणार आहे. ते नाव लवकरच निश्चित होईल, असे ठाले-पाटील म्हणाले.

राजकीय मंडळी संमेलनास वज्र्य नाहीत. ते सहभागी होऊ शकतात; पण व्यासपीठावर त्यांना स्थान मिळणार नाही. गेल्या वर्षीपासून आपल्या या भूमिकेला महामंडळाने पाठिंबा दिला आहे. कदाचित ती बदलली जाऊ शकते, याकडेही ठाले-पाटील यांनी लक्ष वेधले. या संमेलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या सहस्रचंद्र्शनाची ‘विशेष भेट’ दिली जाणार असल्याची साहित्यिक वर्तुळात चर्चा आहे. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर त्यांनी अशा सोहळ्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे सांगितले.

हे वाचले का?  Social Media Ban for Kids : “लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार, ‘हा’ देश कायदा बनवण्याच्या तयारीत!

दरम्यान, कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीत होत असलेल्या संमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. नारळीकरांची निवड होणे ही घटनाच मराठी साहित्य विश्वाला आनंद देणारी आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली.

राजकारण्यांना स्थान नाही!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या सहस्रचंद्रदर्शनाची ‘विशेष भेट’ या संमेलनाच्या रूपात दिली जाणार असल्याची चर्चा होती; परंतु अशा सोहळ्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी स्पष्ट केले. राजकीय मंडळी संमेलनास वज्र्य नाहीत, ते सहभागी होऊ शकतात; पण व्यासपीठावर त्यांना स्थान मिळणार नाही. गेल्या वर्षीपासून आपल्या या भूमिकेला महामंडळाने पाठिंबा दिला आहे. कदाचित ती बदलली जाऊ शकते, असेही ठाले-पाटील यांनी नमूद केले.

ते’ भाकीत खरे ठरले : डॉ. नारळीकर

माझी एक कथा ‘किलरेस्कर’मध्ये प्रकाशित झाली होती. ती वाचल्यानंतर ‘तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हाल’ असे मुकुंदराव किलरेस्कर मला म्हणाले होते. मुकुंदरावांचे ते भाकीत खरे ठरले, अशी भावना डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली.

मराठी भाषेसाठी फार महत्वाचे काम करणारे नारळीकर

खगोलशास्त्रात महत्वपूर्ण मूलभूत संशोधन करणारे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होत आहेत हे ऐकून आनंद झाला. इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत भाषांचा त्यांचा व्यासंग आहे आणि त्यावर त्यांचे प्रभूत्वही आहे. सोप्या शब्दांत विषयाचे मर्म उलगडून सांगायची वृत्ती आणि उर्मी, आपले गुरु डॉ. फ्रेड हॉईल (ज्यांनी ‘ब्लॅक क्लाऊड’ सारख्या अप्रतिम कथा-कादंबऱ्या ही लिहील्या) यांचा आदर्श यामुळे डॉ. नारळीकरांनी ‘आकाशाशी जडले नाते’सारखी खगोलशास्त्र सुलभ भाषेत समजावून, त्याची गोडी लावतील अशी वैज्ञानिक पुस्तके, ‘यक्षांची देणगी’सारखी विज्ञान कथांची पुस्तके, भारतीय शास्त्र-परंपरेचा वारसा समजावून सांगणारी पुस्तके व प्रेरणादायी आत्मचरित्र अशी उत्तम मराठी साहित्यनिर्मिती केली. मराठी भाषा टिकून राहण्यासाठी, वृद्धिंगत होण्यासाठी हे फार महत्वाचे काम त्यांनी केले आहे.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

– डॉ. दिनेश ठाकूर, प्रसिद्ध गणितज्ज्ञ